छत्रपती संभाजीनगर - औरंगजेबाच्या बाबतीत अनेकजण आपले तर्क वितर्क लावतात. आमची भूमिका अत्यंत वेगळी आहे. औरंगजेबाला मारलं गेले नाही, त्याचा मृत्यू नगरला झाला. औरंगजेबाने त्या काळात घेतलेली जागा, तिथे त्याची कबर असावी असं त्याचे स्वप्न होते. त्यामुळे नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला छत्रपती संभाजीनगरला आणलं म्हणून औरंगजेबाला पुरलं, त्याला गाडलं असं काही नाही. हा चुकीचा इतिहास राज ठाकरेंना कुणीतरी सांगितला आहे असं सांगत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी राज यांच्या भूमिकेला विरोध केला.
औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका, त्याच्या कबरीजवळ मराठ्यांना संपवायला आलेल्याला आम्ही इथं गाडलं असा बोर्ड लिहा असं राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात म्हटलं. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता. त्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आला. संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको अशी आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच औरंगजेबाला आम्ही गाडलंय का, तर नाही..त्याने स्वत:ला तिथे गाडून घेतले आहे. त्यामुळे आम्हाला हा इतिहास पुसायचा आहे हे कबर हटवण्यामागे आमचे धोरण होते. त्यात राजकारणाचा भाग येत नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड आहे. त्याला कायद्याने संरक्षण मिळालं आहे. परंतु आम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिंदेसेनेत २ मतप्रवाह...
दरम्यान, औरंगजेबाची कबर जिथं आहे तिथे राहू द्या परंतु त्याचे उदात्तीकरण व्हायला नको. त्याला धार्मिक स्थळाचा दर्जा नको. त्याठिकाणी मोठमोठी बांधकाम नको. राज ठाकरे बोलले त्या प्रमाणे तिथे बोर्ड लावला पाहिजे. जो स्वराज्य संपवायला आला त्याला याच मातीत गाडले परंतु तो स्वराज्याला हात लावू शकला नाही हे लिहिलं पाहिजे. औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रात कसा झाला हे पुढच्या पिढीला समजायला हवे त्यामुळे राज ठाकरे बोलले ते योग्य आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.