ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - देशातील महिलावर्गासाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीन्सवर १२ टक्के GST कर लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज (29 मे) मुंबईतील ‘चर्चगेट’ रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
या मोहीमेचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. या मोहीमेत मोठ्यासंख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. दरम्यान सॅनिटरी नॅपकीन्सला जीएसटीतून पूर्णपणे वगळ्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली.
यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले की, सॅनिटरी नॅपकीन्स ही महिलांच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू आहे. एकीकडे सौंदर्यप्रसादने ही करमुक्त केली जातात, मात्र महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीन्सवर कर लावला जातो ही बाब गंभीर आहे.
आज राज्यातील २० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकीन्स म्हणजे काय हेच माहिती नाही तर आर्थिक कारणांमुळे ग्रामीण भागातील महिला सॅनिटरी पॅड्सचा उपयोग करू शकत नाही, अशी परिस्थिती असताना कर लावून या वर्गाला सॅनटरी नॅपकीन्स वापरण्यावर एकप्रकारे निर्बंध घातले जात आहे.
आज जगभरात २७ टक्के महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यामध्ये भारतीय महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या परिस्थितीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी जनजागृतीसोबतच त्यांना परवडतील अशा किंमतीत सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन ‘सॅनिटरी नॅपकीन्सला’ जीएसटीतून वगळावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.