सांगली : उसाला वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात केलेले आंदोलन व खासदार राजू शेट्टी यांच्यावर केलेली अटकेची करवाई, याचे पडसाद सोमवारी सांगली व मिरज येथे उमटले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. तर, मिरजमध्ये दगडफेक करून दोन एसटी बस फोडल्या.एफआरपीसाठी स्वाभिमानीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर दगडफेक झाली. याप्रकरणी खासदार शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईचे वृत्त शहरात येऊन धडकताच संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. याच्या निषेधार्थ सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाट्यावर अचानक रास्ता रोको केला. तासभर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पलूसहून सांगलीकडे येणाऱ्या दोन एसटी बसवर नांद्रेत दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या आठ एसटी बस नांद्रेतच थांबविण्यात आल्या. नंतर रात्री उशिरा या बस पोलीस बंदोबस्तात सांगलीच्या मुख्य बसस्थानकात आणण्यात आल्या. नांद्रेसह वसगडे (ता. मिरज) येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पुण्यातील आंदोलनाचे सांगलीत पडसाद
By admin | Updated: January 13, 2015 04:43 IST