संतोष वानखडे/वाशिमवृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने, वृक्षारोपण करतानाच सेल्फी पाठविल्यानंतरच संबंधितांचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विभागात असा निर्णय घेणारी वाशिम जिल्हा परिषद पहिली ठरली आहे.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी रोपट्यांची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील २0 टक्के भूभाग वनाच्छादीत असला तरी, यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल आहे. उर्वरित चार टक्के क्षेत्र हा विरळ भाग आहे. या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करणे आणि राज्यातील वनाच्छादीत क्षेत्र वाढविण्याचा या मोहिमेमागील उद्देश आहे. प्रत्येक जिल्हय़ाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असून, वाशिम जिल्हय़ाला २ लाख ३५ हजार ५00 असे उद्दिष्ट मिळाले आहे. यापैकी जिल्हा परिषदेच्या वाट्यावर ८0 हजारांचे उद्दिष्ट आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. शाळा, खासगी शाळा, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन दवाखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे. वृक्षारोपण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून वृक्षारोपण करतानाच सेल्फी फोटो काढणे जिल्हा परिषद प्रशासनाने बंधनकारक केले आहे. वृक्षारोपणाची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने असा सेल्फी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला नाही तर वेतन रोखण्याची तंबीही देण्यात आली. वृक्षारोपण करतानाचा सेल्फी मिळाल्यानंतरच त्या संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांचे वेतन निघणार आहे. या सेल्फीमुळे वृक्षारोपण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
वृक्षारोपणाच्या ‘सेल्फी’नंतरच वेतन!
By admin | Updated: July 1, 2016 00:02 IST