ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १० - गेल्या काही दिवसापूर्वी फाशी देण्यात आलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनविषयी ट्विट करणारा अभिनेता सलमान खान वेडा आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले आहे.
अभिनेता सलमान खानवर गेली बारा वर्षे खटला चालू आहे, तरी त्याचा अद्याप निकाल लागला नाही. गेल्या काही दिवसापूर्वी फाशी देण्यात आलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनविषयी ट्विट करणारा हा सलमान वेडा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळी सलमानच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्याला नाही तर त्याचे वडील सलीम खान यांना भेटायला गेलो होतो. त्याचे वडिल कुठे आणि तो कुठे ? त्याने मेमनविषयी ट्विट केलेले चुकीचेच होते.
न्यायव्यस्थेवर टिका करत, खटला चालविणा-या न्यायाधिशांच्या घरचे न्यूज चॅनल, वर्तमान पत्रे बंद करावी. तसेच, त्यांच्या खटल्याचा निर्णय देणा-या न्यायाधिशांची नावे गुपीत ठेवावी, तरच खटल्यांचे निर्णय लवकर लागतील असे राज यांनी सांगितले.
याचबरोबर उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही गुप्त भेट झाली नसून भाजपला घाबरवण्यासाठी उद्धवभेटीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगला माणूस असून चांगली कामे करत आहेत, पण ती त्यांना काम करू दिली जात नाहीत. कारण त्यांचे हात बांधले आहेत. राज्यात भाजप सरकार आल्यानंतरही काही फारसा बदल जाणवत नाही. तसेच, भाजप सरकार भ्रष्ट सरकार आहे, असे लवकर होईल असे वाटले नव्हते. आपल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दप्तर वजनकाट्याने मोजतात, त्यांना कोण सांगणार वजन दप्तराचे नाही अभ्यासक्रमाचे वाढले आहे, अशी टीका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते आणि ओवेसी यांच्यावरही राज ठाकरे यांनी यावेळी हल्लाबोल केला.