बेळगाव : सांबरा गावातील मराठी भाषिकांनी घरांवर लावलेले भगवे ध्वज पोलिसांनी दमदाटी करून हटविल्यामुळे सांबरा गावात दिवसभर तणाव निर्माण झाला होता . मारिहाळ पोलीस ठाण्याचे फौजदार आणि पोलीस गावात आले आणि त्यांनी घरावर लावलेले भगवे ध्वज हटवा; अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी ग्रामस्थांना दमदाटी केली. एकूण साठहून अधिक घरांवरील ध्वज फौजदाराने हटवायला लावले. आमच्या घरावर लावलेला भगवा ध्वज हटविण्याचा अधिकार फौजदाराला कोणी दिला? अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. मराठी भाषिकांनी आपली अस्मिता जपण्यासाठी घरांवर लावलेले ध्वज पोलिसांना खुपायला लागलेत असेच चित्र दिसून आले. फौजदाराच्या या कृत्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप निर्माण झाला. याची माहिती काही ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून उत्तर विभागाचे आयजीपी भास्कर राव यांना दिली. त्यावर भास्कर राव यांनी घरावर लावलेले ध्वज काढण्याचा आदेश दिला नसल्याचे सांगितले. घरावर ध्वज लावण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असे भास्कर राव यांनी सांगितले. पोलिसांनी काढायला लावलेले भगवे ध्वज पुन्हा लावण्याचा निर्धार सांबरा ग्रामस्थांनी केला आहे.
मराठी भाषिकांच्या घरांवरील भगवे ध्वज पोलिसांनी हटविले
By admin | Updated: November 5, 2014 00:50 IST