ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असा खुलासा शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रमुख असलेल्या शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमततर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात शरद पवार यांनी लोकमतच्या संपादकांशी दिलखुलास संवाद साधला.क्रिकेटच्या मैदानावरच महेंद्रसिंग धोनीची सचिन, सेहवागसारख्या ज्येष्ठ खेळाडूंबद्दलची नाराजी हा चर्चेचा विषय होता. ज्येष्ठ खेळांडूना संघात घेण्याबद्दल ढोणी विशेष उत्सुक नसायचा. मात्र याच धोनीला भारताचा कर्णधार बनवण्यात यावे अशी सूचना खुद्द सचिनने केली होती, असे पवार म्हणाले. एक गुणवान खेळाडू असलेल्या ढोणीने कर्णधारपद भूषणवताना भारताला अनेक सामने जिंकून दिले, त्याची कामगिरी मोलाची होतीच यात शंका नाही, पण त्याला कर्णधार बनवण्याची सचिनची सूचनाही तितकीच महत्वाची होती असेही पवार म्हणाले.
राजकारणाप्रमाणेच क्रिकेटमध्येही विशेष रस असलेल्या पवार यांची क्रिकेटच्या वर्तुळातील कारकीर्दही गाजली. ते क्रिकेटमध्ये अनेकदा हस्तक्षेप करतात, असा आरोपही झाला. पण मी क्रीडा क्षेत्रात कधीच हस्तक्षेप केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधांसाठी मात्र मी नेहमीच लक्ष देऊन काम केले, असेही त्यांनी सांगितले.