चेतन ननावरे, मुंबईसलग चार वेळा निवडून आलेल्या आमदाराने मतदारसंघ बांधलेला असतो. त्यामुळे निवडणुकीत त्याला प्रचार करण्याची गरज भासू नये, असे म्हणतात. ही बाब शिवडीतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना लागू होते. निवडणूक काळात त्यांचा दिनक्रम जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्यासोबत भ्रमंती केली. सूर्योदयापूर्वीच बाळा नांदगावकर यांच्या दिवसाची सुरुवात झाली. विभागातील उद्यानात नांदगावकर मॉर्निंगवॉक करतानाच मतदारांसोबत संवाद साधताना दिसले. समस्या ऐकल्यानंतर कोणतेही आश्वासन न देता ते घरी परतले. घरी आल्यावर तत्काळ पदाधिकाऱ्यांना फोन करून समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले. सकाळी सात वाजता त्यांनी प्रचारासाठी घर सोडले. कार्यकर्त्यांसोबत बैठका आटोपत ठीक दहा वाजता ते राम टेकडी येथे पोहोचले. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे दिमाखदार स्वागत झाले. शेकडो कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा... विजय असो’, ‘तन मन दिलसे, मनसे... मनसे...’ अशा घोषणांनी राम टेकडी परिसर दुमदुमला. वाकडी चाळ परिसरातून प्रचाराला सुरुवात झाली. मनसेच्या झेंड्याची रंगाच्या साड्या नेसून महिला कार्यकर्त्या जोशात प्रचार करत होत्या. वाकडी चाळीतून परशुराम नगरमध्ये पोहोचलेल्या प्रचारफेरीचे स्वागत स्थानिकांनी नांदगावकर यांना पुष्पगुच्छ देत केले. नांदगावकर यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांमुळेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शौचालये मिळाल्याचा दावा स्थानिकांनी केला. यावेळी आमचे मत मनसेलाच अशी ग्वाही देत नागरिकांनी नांदगावकर यांचे आभारही मानले. प्रचारफेरी ए, बी, सी, डी वॉर्डमध्ये फिरून अभिलाषा सोसायटीमार्गे न्यू पपई अड्ड्यात पोहोचली. तासभर उन्हात चालूनही नांदगावकर यांचा जोश कमी झाला नव्हता. रात्री उशिरापर्यंत ही धावपळ सुरू होती.
धावपळीतही उत्साह कायम
By admin | Updated: October 11, 2014 06:13 IST