ऑनलाइन लोकमतसातारा , दि. ३१ : 'रिओ आॅलिम्पिक' स्पर्धेतील भारताची धावपटू अर्थात 'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर हिला 'बकअप' करण्यासाठी रविवारी सकाळी तब्बल १६ हजार धावपटूंनी 'माणदेश मॅरेथॉन'मध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. 'रन फॉर ललिता'साठी दहिवडीत दाखल झालेल्या हजारो मुला-मुलींचा हा उत्साह पाहून तिच्या गावचे स्थानिक नागरिकही पुलकित झाले.ब्राझिलमध्ये होणा-या 'रिओ आॅलिम्पिक' स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या इवल्याशा मोही गावातील ललिता बाबर कसून सराव करत आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणारी ललिता आता माणदेशापुरती राहिली नसून संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता बनली आहे. म्हणूनच या 'सातारा एक्स्प्रेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी 'रन फॉर ललिता' हे घोषवाक्य घेऊन 'माण देश मॅरेथान २०१६'चे आयोजन केले होते.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. दहिवडी येथील कर्मवीर चौकापासून स्पर्धेस प्रारंभ झाला. शुभारंभप्रसंगी महादेव जानकर, सदाभाऊ खोत अन विजय शिवतारे हे तीन मंत्रीही आवर्जून उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे अन कॉंग्रेसचे आमदार हेही सर्व राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून प्रथमच एकत्र आले होते.
१२ वर्षांखालील मुले, १२ वर्षांखालील मुली, १५ वर्षांखालील मुले, पंधरा वर्षांखालील मुली, १८ वर्षांखालील मुले, १८ वर्षांखालील मुली, खुला पुरुष, खुला महिला व ४५ वर्षांपुढील प्रौढ आणि सेलिब्रेटी असे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते.