मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देदीप्यमान विजय मिळाल्याने फॉर्मात असलेल्या भाजपा-शिवसेनेने विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्यांची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आघाडीची कसोटी लागेल. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागा जिंकलेली महायुती चार महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवत अधिवेशनात सरकारला घेरण्याची एकही संधी सोडणार नाही. विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असली तरी सरकारची कोंडी करण्यासाठी त्यांचा पक्ष रविवारी महायुतीच्या तंबूत दिसला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन सोमवारी सुरु होणार्या अधिवेशनात सरकारवर तोफ डागण्याचे इरादे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत महायुतीशी फारकत घेतलेल्या शेतकरी कामगार पक्षाने मात्र भाजपा-शिवसेनेपासून अंतर राखणेच पसंत केले. विरोधकांच्या पत्रपरिषदेला शेकापचे कोणीही नव्हते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकून संघर्षाची नांदी दिली. १४ जूनपर्यंत चालणार्या या अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार हे २०१४-१५ चा अर्थसंकल्प ५ जूनला सादर करणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
सत्ताधारी आघाडीची कसोटी
By admin | Updated: June 2, 2014 06:38 IST