ठाणे : ठाणे आरटीओने महिला रिक्षाचालकांसाठी घातलेले सुधारित नियम केवळ त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. या नियमांमुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागणार असून ते आरटीओने रद्द करावे, अशी मागणी ठाण्यातील महिला रिक्षाचालकांनी केली आहे. महिला परवानाधारक मालकीची रिक्षा त्या महिलेनेच चालवली पाहिजे. रिक्षाचा रंग हा अबोली असला पाहिजे. महिला परवानाधारकाची रिक्षा पुरुषाने चालवल्यास परवाना रद्द करण्यात येईल, या नियमांविरोधात ठाण्यातील महिला रिक्षाचालक आक्रमक झाल्या आहेत. हे नियम महिला रिक्षाचालकांसाठी अन्यायकारक असल्याने ते तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बँक, पतसंस्था तसेच हातउसने व जमेल तसे कर्ज घेऊन महिलांनी रिक्षा खरेदी केल्या. परंतु, रिक्षाचा रंग अबोली असल्याने वाहनांची नोंदणी अद्याप आरटीओने केलेली नाही. >आरटीओच्या नियमांमुळे आर्थिक नुकसान महिला रिक्षाचालकांना सोसावे लागणार आहे. आम्ही कर्ज काढून रिक्षा खरेदी केलेली आहे. त्याचे हप्ते फेडण्यासाठी रिक्षा सतत चालवणे गरजेचे आहे. जे महिलांसाठी अशक्य आहे, महिलांची रिक्षा फक्त महिलांनीच चालवावी, असा नियम ठेवल्यास आम्ही रिक्षासाठी काढलेले कर्ज वेळेत कसे फेडणार? घरातील एखाद्या पुरुष मंडळीने रिक्षा चालवल्यास घराला हातभारही लागेल. या जाचक अटींमुळे केवळ नुकसानच होणार आहे, अशी व्यथा महिला रिक्षाचालक कविता घोसाळकर यांनी मांडली. असे जाचक नियम आरटीओ लावत असेल तर नवीन महिला रिक्षाचालक पुढे येतील का, असा सवालही या महिला रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.
महिलांसाठी आरटीओचे नियम जाचक
By admin | Updated: July 4, 2016 03:37 IST