कारंजा लाड (जि. वाशिम): राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी शासनाकडून ५0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून राज्यातील क्रीडा संकु लांसाठी प्रस्तावानुसार अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय २४ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. सध्या विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी २४ कोटी, ८ कोटी आणि १ कोटी रुपये या प्रमाणे अनुदान देण्यात येते. क्रीडा संकुलांच्या बांधकामानंतर त्यांच्या देखभालीसाठी शासनाच्या निर्णयानुसार विभागीय क्रीडा संकुलासाठी पहिल्या तीन वर्षांंंकरिता १५ लाख, १२.५0 लाख आणि १0 लाख रुपये, जिल्हा क्रीडा संकुलासाठी पहिल्या तीन वर्षाकरिता १0 लाख, ७.५0 लाख आणि ५ लाख, तर तालुका क्रीडा संकुलाकरिता पहिल्या तिन्ही वर्षांंंसाठी ३ लाख रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. यासाठी कोणतेही निकष अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने त्यांच्या २२ जून २0१५ च्या पत्रान्वये क्रीडा संकुलाच्या देखभालीबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने या योजनेत २0१५-१६ मध्ये उपलब्ध अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या दोन कोटी २८ लाख रुपयांच्या निधीपैकी क्रीडा संकुलांच्या देखभालीसाठी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीतून क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुदान देताना प्रतिवर्ष संकुल देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेले अनुदान, क्रीडा संकुलास प्राप्त होणारे उत्पन्न यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसारच हा निर्धी खर्च करावा लागणार आहे. यामुळे भग्नावस्थेत असलेल्या क्रीडा संकुलांची दुरुस्ती करणे शक्य होणार असून, खेळाडूंना सुविधा प्राप्त होणार आहे.
राज्यातील क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५0 लाखांची तरतूद
By admin | Updated: September 28, 2015 02:10 IST