नवी मुंबई : रिक्षाचालकांनी रस्त्यावरच सुरू केलेल्या अनधिकृत थांब्यामुळे घणसोलीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. सकाळ-संध्याकाळ त्याठिकाणी लागणाऱ्या रिक्षांच्या रांगांमुळे रस्ता अडवला जात आहे. मात्र वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.घणसोली रेल्वेस्थानकासमोर तसेच काही अंतरावर पंचवटी चौकात रिक्षाचालकांचे अनधिकृत थांबे तयार झाले आहे. मुख्य मार्गावरच त्यांनी सुरू केलेल्या या थांब्याच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे सदर दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामध्ये एनएमएमटी व बेस्ट बसमधील प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच त्याठिकाणी अपुरे रस्ते असताना चौका-चौकात रिक्षाचालकांनी जागा बळकावल्यामुळे तसेच रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे ही समस्या उद्भवत आहे. यामुळे घणसोली रेल्वेस्थानक ते पोलीस चौकीदरम्यानच्या अवघ्या काही मीटर अंतराच्या प्रवासात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.रस्त्यावरच उभ्या असणाऱ्या या रिक्षांमुळे त्याठिकाणी अनेक अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. त्यावरून खासगी वाहनचालक व रिक्षाचालकांमध्ये भांडणाचे प्रकार देखील घडत असून त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले आहे. (प्रतिनिधी)>वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षएकीकडे फेरीवाल्यांनी पदपथ तर रिक्षाचालकांनी रस्ते बळकावल्याचे चित्र त्याठिकाणी पहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांनी चालायचे कुठून, असा प्रश्न उपस्थित केला आहे. वाहतूक पोलिसांकडून यावर कारवाई होत नसल्याचा संताप नागरिकांमध्ये आहे. या मार्गावर सततची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दुतर्फा होणारी पार्किंग बंद व्हावी.
घणसोलीत रिक्षाचालकांनी बळकावले रस्ते
By admin | Updated: July 4, 2016 02:54 IST