मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवारी मुंबई वगळता राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआयसह काँग्रेसचे विविध विभाग व सेलचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर पन्नास टक्क्यांहून खाली घसरलेले असतानाही मोदी सरकार पेट्रोल-डिझेलची दरकपात करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला़ नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव ग्रामीण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पालघर, मीरा-भार्इंदर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, बुलडाणा, वाशिम, अकोला, अकोट, अमरावती, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी व फडणवीस सरकारविरोधात घोषणा देत रास्ता रोको केला़ या आंदोलनांत त्या त्या जिल्ह्णातील माजी मंत्री, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलिसांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजपाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपासून घूमजाव केल्याने जनतेच्या मनात नाराजीची भावना निर्माण झाल्याने काँग्रेसच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसची पाठमुंबई विभागीय काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व असून, रास्तारोकोबाबत हायकमांडकडून सूचना मिळाल्या नसल्याचे कारण देत मुंबईतील नेत्यांनी आंदोलनाकडे पााठ फिरवली. तर आंदोलनासाठी हायकमांडच्या सूचनांची आवश्यकता नसून प्रदेशस्तरावरच याची रूपरेषा ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, महापालिकेतील मुद्द्यांवर मुंबईत आधीच आंदोलने सुरू असून, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस असा वाद नसल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)
सरकारविरोधात रस्त्यावर
By admin | Updated: February 10, 2015 02:28 IST