राजुरी : महावितरण कंपनीने भूमिगत वीजवाहिन्या (केबल्स) ज्या ठिकाणाहून गेल्या आहेत, अशा ठिकाणी दर्शक फलक लावावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे पुणे विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केली आहे. महावितरण कंपनीने गेल्या तीन वर्षांत अनेक ठिकाणी भूमिगत केबल्स टाकल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या शेतातून बांधाच्या कडेने, पानाच्या कडेने, रस्त्याच्या कडेने, गल्लीबोळातून आदी ठिकाणाहून गेल्या आहेत. सदर भूमिगत वीजवाहिन्या लघुदाब (एलटी) उच्च दाबाच्या आहेत. मंचर, नारायणगाव, जुन्नर शहरांमध्ये भूमिगत वाहिन्या टाकल्या आहेत. परंतु खेड्यांतून शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करताना, पाइपलाइन करताना वा अन्य कामे करताना, गटारे उतरताना, पाण्याचे पाइप टाकताना अपघात होऊ शकतात. नुकताच अशा एका अपघातात एकाचा मत्यूही झाला आहे. मात्र, या वाहिन्या (केबल्स) कुठून जातात, हे दर्शविणारे साधे फलकसुद्धा महावितरण कंपनीने लावलेले नाहीत. संबंधित ठेकेदार काम करून निघून जातात, अधिकारी बदलून जातात पण भविष्यात जर धोका झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न औटी यांनी महावितरण कंपनीला केला आहे.
भूमिगत वीजवाहिन्यांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 01:44 IST