ठाणे : प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या तसेच रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा आणणाऱ्या खासगी बेकायदेशीर बसेसवर कारवाईसह विविध मागण्यासांठी ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी हजारो रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक दिली. नितीन कंपनी जंक्शन ते सेंट्रल मैदान येथील आरटीओ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मैदा सेंट्रल मैदानाजवळ आल्यावर तो अडवण्यात आला. तेथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाल्याने मार्गदर्शन करताना इंदिसे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. रिक्षाचालक-मालक हा गरीब, दलित, बहुजन समाजातला आहे. त्यांचा पोट भरण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. सरकारने त्यांचे दु:ख समजावून घ्यावे आणि त्यांना तत्काळ न्याय द्यावा अन्यथा, अन्यायाने भयग्रस्त झालेला हा रिक्षावाला आपल्या अधिकारासाठी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही दिला. या वेळी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करावी, रिक्षा परवाने प्रदान करण्याच्या प्रक्रि येत सुसूत्रता आणावी, म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून रिक्षाचालकांना घरे देण्यात यावीत, १६ वर्षांची रिक्षा स्क्रॅप करण्याचा नियम रद्द करावा, ग्रीन टॅक्सची सक्ती रद्द करावी, महागाईच्या प्रमाणात दरवाढ द्यावी, बॅजसाठीची १५ वर्षे वास्तव्याची अट रद्द करावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन, एकता रिक्षा-टॅक्सीचालक-मालक सेना, ठाणे आॅटोमेन्स रिक्षा युनियन, ठाणे शहर रिक्षा टॅक्सी युनियन, भारतीय जनता पार्टी रिक्षा टॅक्सी युनियन, राष्ट्रवादी रिक्षा-टॅक्सीचालक-मालक महासंघ, सम्राट रिक्षा-टॅक्सी युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि संघर्ष रिक्षा-टॅक्सी युनियनचे रवी राव, भरत चव्हाण, आदी प्रमुख युनियन नेत्यांसह हजारो रिक्षाचालक-मालक या मोर्चात उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिक्षाचालक ‘आरटीओ’वर धडकले
By admin | Updated: April 7, 2015 04:30 IST