मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी जाहीर केला जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी पुण्यात सांगितले की, १७ जूनला दुपारी १ वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात येतील. मात्र संकेतस्थळे कोणती आहेत, याची यादी अद्याप तयार झालेली नाही. यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त असल्याने संकेतस्थळांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. संकेतस्थळांची यादी पुढील २ दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कधी गुणपत्रिका मिळतील, याची तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने छपाईचे काम वाढले आहे. छपाईच्या कामाचा आढावा घेऊन गुणपत्रिका देण्याची तारीख जाहीर करण्यात येईल.दहावीचा निकाल यंदाही ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ निकषानुसारच जाहीर होणार आहे. गेल्यावर्षी ७ जूनला निकाल मंडळाने जाहीर केला होता. मात्र यंदा ७ जून उलटून गेला तरी निकालाची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)
दहावीचा निकाल १७ जूनला
By admin | Updated: June 14, 2014 04:24 IST