ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आव्हाडांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
शिवशाहीर बाबासेहब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणा-या आव्हाड यांच्यावर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ' या संदर्भातील राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपण योग्य जबाबदारी घ्याल' अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
'जितेंद्र आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन आव्हाड यांच्याबद्दल अशीच भूमिका घेतली जाईल अशी दिलेली धमकी हे धक्कादायक आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणा-या महाराष्ट्रात वाढत असलेली ही असहिष्णूता व झुंडशाही चिंताजनक बाब आहे, असे पवारांनी पत्रात नमूद केले आहे.
' आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची नोंद राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण व्यक्तिशः घ्याल व आव्हाड यांच्यासंदर्भात काही अघटित घडू नये अशी आपली भूमिका असेल अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपणास या संदर्भातील जबाबदारी टाळता येणार नाही' असेही पवारांनी म्हटले आहे.