मुंबई : बिहारमध्ये ‘दबंग पोलीस अधिकारी’ असा लौकिक मिळविणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आता महाराष्ट्रात तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर येत आहेत. लवकरच त्यांना पदस्थापना दिली जाईल. लांडे यांनी महाराष्ट्रात वैयक्तिक कारणांसाठी प्रतिनियुक्तीवर जाण्याची विनंती केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडे केली होती. ती मान्य झाली आहे. लांडे हे २००६च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याच्या पारस येथील मूळ रहिवासी असलेले लांडे यांनी बिहारमधील कारकिर्द गाजविली. ‘बिहारचा सिंघम’ असे त्यांना कौतुकाने म्हटले जाते. पाटणा येथे पोलीस अधीक्षकपदाच्या काळात त्यांनी अवैध धंद्यांना आपल्या दबंग स्टाईलने आळा बसविल्याने ते विशेषत: तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे लांडे हे जावई आहेत. (विशेष प्रतिनिधी)
बिहारच्या ‘सिंघम’ची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 04:42 IST