मुंबई : ठाण्यातील कळवा भागात खारभूमी विकास विभागाच्या जागेवर सेंट्रल बिजिनेस डिस्ट्रीक्ट (सीबीडी) उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्त्वत: मान्यता दिली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर या संकुलाची उभारणी होणार आहे. कळवा येथील खारभूमी विकास विभागाच्या जमिनीवर विविध प्रशासकीय प्रकल्पांच्या कामांबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संजय केळकर उपस्थित होते. कळवा येथील खारभूमी विकास विभागाची (जलसंपदा विभाग) जमीन विविध विभागांना प्रशासकीय प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आली आहे. या जागेवर सध्या कुठली विकासकामे सुरू आहेत याबाबतचा आढावा या वेळी घेण्यात आला. या जागेवर सेंट्रल बिजिनेस डिस्ट्रीक्ट (सीबीडी) उभारण्याची संकल्पना महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मांडली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. कळवा येथील जागेचा सीबीडीप्रमाणे विकास झाल्यास औद्योगिकीकरणास चालना मिळण्यासोबतच तेथे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या दृष्टिकोनातून या जागेचा बृहत् आराखडा तयार करावा, त्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) नियुक्ती करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
दुसरे बीकेसी आता कळव्यात
By admin | Updated: January 31, 2015 05:39 IST