शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

संघर्षाचा स्मरण दिन !

By admin | Published: April 30, 2017 2:58 AM

१ मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिनी शोषणाविरुद्धचा लढा प्राणपणाने लढण्यासाठी व समाजवादी समाजव्यवस्था स्थापन करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्याचा दिवस म्हणजे कामगार दिन!

- अजित सावंत१ मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिनी शोषणाविरुद्धचा लढा प्राणपणाने लढण्यासाठी व समाजवादी समाजव्यवस्था स्थापन करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्याचा दिवस म्हणजे कामगार दिन! ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ या काल मार्क्स यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देण्याचा दिवस म्हणजेच १ मे ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन!’४ मे १८८६ रोजी कामगारांचे जत्थेच्या जत्थे शिकागोच्या हेमार्केट चौकामध्ये येऊ लागले. ‘आठ तासांचा दिवस’ या मागणीसाठी असलेल्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी व आदल्या दिवशी पोलीस गोळीबारात मरण पावलेल्या सहा कामगारांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या शांततामय निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी हे कामगार हजारोंच्या संख्येने जमले होते. घोषणा देणाऱ्या हजारो कामगारांच्या मुखातून सरकारविरोधात संताप व्यक्त होत होता. सभा संपत आली व अचानक पोलिसांनी जमलेल्या निदर्शक कामगारांवर हल्ला चढवला. कामगार सैरावैरा पळू लागले. गोंधळाच्या वातावरणात कुणीतरी जमावावर बॉम्ब फेकला. स्फोटामध्ये व पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार कामगार व सात पोलीस ठार झाले. शेकडो कामगार जखमी झाले. पुढे कामगारांच्या नेत्यांवर भरलेल्या खटल्यामध्ये आठ जणांना बॉम्बस्फोटाबद्दल जबाबदार ठरवून दोषी ठरविण्यात आले. साक्षी-पुराव्यावरून हे सिद्ध केले गेले की, ‘आरोपींपैकी कुणीही प्रत्यक्ष बॉम्ब फेकला नसला तरी त्यांच्यापैकी कुणीतरी बॉम्ब बनविला असू शकतो.’ आरोपी कामगार नेत्यांपैकी सात जणांना मृत्युदंडाची व एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आरोपींपैकी एकाने तुरुंगातच आत्महत्या केली व दोघांना मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलण्याचा निर्णय इलिनॉइस प्रांताच्या गव्हर्नरनी घेतला. इतर चार जणांना ११ नोव्हेंबर १८८७ रोजी फाशी देण्यात आले. ‘आठ तासांचा दिवस’ या हक्काच्या मागणीसाठी जगातील कामगारांच्या संघर्षगाथेचे हे चार धीरोदात्त नायक पार्सन, स्पाइस, एंगल व फिशर, कामगारवर्गासाठी हुतात्मा झाले. चार कामगार नेत्यांना फासावर लटकविण्याचा निकाल देणारा हा खटला म्हणजे शुद्ध बनाव होता. जगभरातील कामगारांना धडा शिकविण्यासाठी ‘हेमार्केट घटना’ व नंतरच्या बनावट खटल्याचा कट आखण्यात आला होता हे लवकरच स्पष्ट झाले. इलिनॉइस प्रांताचे नवे गव्हर्नर जॉन पीटर अट्गेल्ड यांनी सहा वर्षांनंतर हा खटला म्हणजे फसवणूक होती, असे सांगून अन्य आरोपी कामगारांची शिक्षा माफ केली. हेमार्केट चौकातील ही घटना कामगारांसाठी संघर्षाची प्रेरणा ठरली व ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ पाळण्याच्या कल्पनेचे उगमस्थानही ठरली. ही घटना घडण्यापूर्वी अनेक वर्षे आधीच ‘आठ तासांचा दिवस’ या मागणीसाठी जगभरातील अनेक उद्योगांमध्ये कामगारांनी लढे देणे सुरू केले होते. १९ व्या शतकाच्या प्रारंभी जम बसवू पाहणारी भांडवलशाही व्यवस्थाच कामगारांच्या पिळवणुकीतून अधिकाधिक नफा कमावण्याच्या संकल्पनेवर आधारित होती. या व्यवस्थेमध्ये कामगारांकडून १५-१६ तास काम करून घेतले जात असे. जेवणाची सुट्टी व साप्ताहिक रजादेखील दिली जात नसे. स्त्री-पुरुष कामगारांच्या वाट्याला भयंकर कष्टाचे जीवन येईल. कामाचे तास वाढवून प्रत्येक दिवशी जास्त काम करून घेऊन श्रमाच्या चुकत्या केलेल्या मूल्यावर अधिकाधिक नफा मिळविणे यासाठी सर्व युक्त्याप्रयुक्त्या केल्या जात. कामगाराचे शोषण करणारा हा डाव कामगारांच्या ध्यानात येऊ लागला. कामाचा दिवस विशिष्ट तासांचा असावा व त्याचे नियमन करण्यात यावे, या मागणीचा रेटा वाढू लागला. भांडवलदारवर्ग व कामगारवर्गातील संघर्ष अटळ झाला. प्रचंड आर्थिक शक्ती असलेला भांडवलदारवर्ग व जोडीला शासकांची दमनशक्ती आणि दुसऱ्या बाजूस शोषणामुळे पिचलेला असाहाय्य परंतु भांडवलशाहीशी लढून हक्क मिळविण्याची जिद्द उरात बाळगलेला कामगारवर्ग असा संघर्ष आकार घेऊ लागला. ‘१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ हा दिवस याच संघर्षाचा ‘स्मरण दिन’ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला वेतनवाढ व आठ तासांचा दिवस या मागण्या कामगारांकडून केल्या जाऊ लागल्या. १८०५ साली फिलाडेल्फिया येथील पादत्राणे बनविणाऱ्या कारखान्यातील कामगारांनी केलेला संप चिरडून टाकण्यात मालकांना यश मिळाले. परंतु कामगार हिंमत हरले नाहीत. १८५० साली आॅस्ट्रेलियातील मेलबोर्नमधील बांधकाम कामगारांनी आठ तासांच्या दिवसासाठी आंदोलने सुरू केली. १८५५ साली कामगारांनी आठ तासांनंतर काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. भांडवलदारांनी कामगारांच्या मागण्या मान्य न करता आडमुठेपणाची भूमिका स्वीकारली. हे पाहून १८५६ साली गवंडी व इतर कामगार अधिक त्वेषाने संपावर गेले. या लढ्याला मात्र यश मिळाले व मेलबोर्न शहरातील ‘आठ तासांचा दिवस’ ही मागणी मान्य करणे भांडवलदारांना भाग पडले. दरम्यानच्या काळात अमेरिकेत कामगार चळवळीने चांगलाच जोर पकडला होता. १८६३ साली यंत्रकामगार व लोहारांच्या संघटनेने स्वत: यंत्रकामगार असलेल्या इरा स्टीवार्डच्या नेतृत्वाखाली आठ तासांच्या दिवसासाठी लढा पुकारला. हा लढा लढण्यासाठी १८६४ साली स्टीवार्डने पहिली कामगार संघटना बांधण्यास सुरुवात केली. याच सुमारास युरोपातही दिवसातील कामाच्या तासांवर मर्यादा असावी हा विचार कामगारांमध्ये बळावू लागला होता. कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स यांच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन (पहिली इंटरनॅशनल) च्या पहिल्या अधिवेशनामध्ये ‘दिवसातील कामाच्या तासांवर मर्यादा घालणे हे कामगारांना शोषणातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टाकडे टाकलेले पहिले पाऊल होय’ असा ठराव मंजूर करण्यात आला.अमेरिकेतील सर्व कामगारांनी एकजुटीने लढा दिल्याशिवाय आठ तासांचा दिवस ही मागणी भांडवलदार स्वीकारणार नाहीत याची जाणीव एव्हाना कामगारांना झाली होती. कामगारांच्या एकजुटीसाठी १८६६ साली ‘नॅशनल लेबर युनियन’ची स्थापना करण्यात आली. या नॅशनल लेबर युनियनने आठ तासांचा दिवस या मागणीसाठी अनेक लढे दिले. लढ्यांचे चटके मालकांना व सरकारलाही जाणवू लागले. १८६८ साली सरकारी कर्मचाऱ्यांनी दिवसी आठ तास काम करावे असे विधेयक कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीसह संमत झाले. ही एक प्रकारे फसवणूकच होती. वेतनकपातीशिवाय कामाच्या तासांवर मर्यादा व आठ तासांचा दिवस या मागणीसाठी अमेरिकेतील निरनिराळ्या उद्योगातील कामगारांनी संपाचे सत्र सुरू केले. या लढ्यापुढे मालकवर्गाने हात टेकले व काही उद्योगधंद्यांतील कामगारांसाठी ‘आठ तासांचा दिवस’ हा कायदा केला गेला.न्यूयॉर्कमधील वीट कामगारांच्याही मागण्या मान्य झाल्या. हा प्रेरणादायी अनुभव पाहून न्यूयॉर्कमधील इतर उद्योगातील कामगारांनीही १८७१ साली लढ्याचे रणशिंग फुंकले. वर्षाच्या आतच, इमारत कामगारांनी तीन महिन्यांत संप नेटाने लढवून, आठ तासांचा दिवस मान्य करून घेण्यात यश मिळवले. पुढे १८७३ साली आलेल्या आर्थिक अरिष्टामुळे अनेक उद्योगधंदे व कारखाने बंद पडले. संधीसाधू भांडवलदारांनी त्याचा लाभ घेऊन एका बाजूस वेतनकपात व दुसऱ्या बाजूस कामाचे तास वाढविण्यास सुरुवात केली. कामगार संघटना मोडून काढण्याचा विडा जणू भांडवलशाहीने उचलला होता. परंतु भांडवलदारांच्या कारस्थानांना तोंड देत कामगार संघटना तग धरून राहिल्या. नॅशनल लेबर युनियन जागा घेतलेल्या ‘फे डरेशन आॅफ आॅर्गनाइज्ड ट्रेड अँड लेबर युनियन आॅफ द युनायटेड स्टेट्स अँड कॅनडा’ने आक्रमकपणे आठ तासांच्या दिवसाचा लढा सुरू ठेवला. ‘आठ तासांचा दिवस’ ही मागणी मान्य करण्यास मालकांना भाग पाडण्यासाठी १ मे १८८६ रोजी सर्व कामगारांना काम बंद ठेवण्याचे आवाहन करणारा ठराव फेडरेशनच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. फेडरेशनशी संलग्न सर्व युनियनच्या कामगार सभासदांनी १ मेच्या संपाची तयारी सुरू केली. १ मे १८८६ रोजी काम बंद करून घोषणा देत कामगार कारखान्याबाहेर पडले. शिकागोसह, न्यूयॉर्क, बाल्टीमोर, वॉशिंग्टन व अमेरिकेतील इतर शहरांमध्येही संपाचे सत्र सुरू झाले. संपाचे लोण पसरत चाललेले पाहून हबकलेल्या भांडवलदारांनी संप मोडून काढण्यासाठी उपाय योजण्यास सुरुवात केली. ३ मे १८८६ रोजी शिकागोतील मॅकामिक रिपर वर्क्सच्या कामगारांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात सहा कामगार ठार झाले व शेकडो गंभीर जखमी झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ मे रोजी पोलिसांच्या निर्घृण हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हजारो कामगार हेमार्केट येथे जमा झाले. हेमार्केट चौकातच कामगारांना धडा शिकवण्याचे कारस्थान भांडवलदारांनी अगोदरच रचले होते. ‘पिंकर्टन खासगी सुरक्षारक्षक व गुप्तचर संघटनेला’ संप फोडण्याची सुपारी दिली गेली होती. तसेच कामगारांना कायमची अद्दल घडविण्याचा कट आखण्यात आला होता. पिंकर्टनच्या हस्तकांनी कामगारांमध्ये शिरकाव करून हिंसाचार केला. पोलिसांकरवी कामगारांवर अत्याचार घडवून पुढे बनावट खटल्याद्वारे चार कामगार नेत्यांना फासावर चढवण्यात आले. हा सर्व नियोजित कट होता हे नंतर स्पष्टही झाले. हेमार्केट चौकातील या घटनेनंतर एक वर्षाने फेडरेशनने पुन्हा आठ तासांचा दिवस या मागणीसाठी संपाची तारीख निश्चित केली १ मे १८९०! सर्व देशांतील सर्व शहरांमधील कामगारांनी आठ तासांचा दिवस या मागणीसाठी एकाच दिवशी म्हणजे १ मे १८९० रोजी सार्वत्रिक संप पुकारावा, असे दुसऱ्या इंटरनॅशनल या जागतिक कामगार संघटनेने ठरवले. अमेरिकेतील कामगारांनी दाखवलेल्या धैर्याला सलाम करून व कामगार चळवळीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर कामगार नेत्यांना श्रद्धांजली वाहून दुसऱ्या इंटरनॅशनलने १ मे हा दिवस भांडवलशाहीचा निषेध दिन म्हणून जाहीर केला. १ मे १८९० रोजी अमेरिका, फ्रान्स, स्पेन, इटली, अर्जेंटिना, बेल्जियम येथील हजारो कामगार काम बंद करून रस्त्यावर उतरले. भांडवलशाहीच्या निषेधाच्या व कामगार एकजुटीच्या घोषणांनी विविध देशांतील शहरे दुमदुमली. पहिला ‘मे दिन’ असा यशस्वी झाला. तेव्हापासून आजतागायत जगभरातील अनेक देशांतील (अमेरिका व काही देश वगळून) कामगार मे दिन साजरा करीत असतात तो भांडवलशाहीचा निषेध दिन म्हणून! या दिवशी हेमार्केट घटनेतील हुतात्म्यांना व कामगार चळवळीत लढा देताना मृत्युमुखी पडलेल्या कष्टकरी बांधवांना आदरांजली वाहिली जाते.

(लेखक हे राजकीय विश्लेषक आहेत.)