जयसिंगपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले शक्तिपीठ महामार्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरी किंवा आठपदरी करावा व राज्य सरकारवर पडणारा शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.गडकरी म्हणाले, ‘सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग कमी रहदारीचा असल्याने तोट्यात चाललेला आहे. भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकार या महामार्गाचे रुंदीकरण करण्यास कोणतीही अडचण नसून, सध्या या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सहापदरी व आठपदरीच्या अनुषंगाने जमिनीचे संपादनही झालेले आहे. केंद्र सरकारने लगेचच हा महामार्ग सहापदरी किंवा आठपदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार आहे.’शेट्टी म्हणाले, ‘राज्य सरकार भक्तांनी मागणी केली नसताना शक्तिपीठ महामार्गाचा घाट घालत आहे. पवनार ते पत्रादेवीपर्यंत असलेली सर्व देवस्थाने ही रत्नागिरी- नागपूर या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत आहेत. कोणत्याही देवस्थानला दर्शनासाठी जात असताना वाहतुकीची कोंडी होत नाही. शक्तिपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बॉक्साइट गोवा याठिकाणी घेऊन जाण्यासाठी होणार असल्याने सामान्य जनतेला याचा कोणताच लाभ होणार नाही. प्रकल्प किमतीत मोठी तफावत केंद्र सरकार करीत असेलेले रस्ते व राज्य सरकार करीत असलेले रस्ते, या प्रकल्प किमतीत मोठी तफावत असून, केंद्र सरकारपेक्षा तिपटीने प्रकल्पाची किंमत जादा आहे. शक्तिपीठ महामार्गातून किमान ५० हजार कोटींचा ढपला पाडला जाणार असून, हा बोजा राज्यातील जनतेच्या माथी पडणार आहे. यामुळे राज्य सरकारने सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून शक्तिपीठ महामार्गास स्थगिती देणे गरजेचे असल्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.
शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:35 IST