मुंबई : नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. मुंबईतील परवाना फेरवाटप १२ जानेवारी रोजी अंधेरी (पश्चिम) येथील आरटीओत मुंबईतील फेरवाटप होईल.या परवान्यांसाठी इच्छुक व पात्र अर्जदारांना ३१ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ या कालावधीत महाआॅनलाइन यांच्या या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून अर्ज करता येणार आहेत. केवळ आॅनलाइन पद्धतीने शुल्कासह अर्ज भरावे लागतील. या लॉटरी ड्रॉसाठी विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील महाआॅनलाइन या संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.राज्यातील १ लाख ४० हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणांस्तव रद्द करण्यात आले होते. या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाने आधी घेतला होता. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी तब्बल चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही अवघ्या २९ हजार ४५० परवान्यांचेच नूतनीकरण झाले. उर्वरित परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार आता शिल्लक १ लाख १० हजारांपैकी ४१ हजार ८८४ परवान्यांचेच लॉटरीद्वारे फेरवाटप होणार आहे. (प्रतिनिधी)
रिक्षा परवान्यांचे फेरवाटप
By admin | Updated: December 30, 2015 01:23 IST