महाड : रायगड किल्ल्याच्या खुबलढा बुरुजाखालील दरड रविवारी मुसळधार पावसामुळे अचानक कोसळल्यामुळे गडाच्या या बुरुजाला धोका निर्माण झाला आहे. वेळीच डागडुजी केली नाही तर हा खुबलढा बुरूजदेखील कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बुरुजाखालील दरड कोसळली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांचा मार्ग ज्या ठिकाणाहून सुरू होतो, त्या चित्र दरवाजापासून थोडे अंतर चढून वर गेल्यावर हा खुबलढा बुरूज लागतो. शिवकाळात शत्रूची टेहळणी करण्यासाठी तसेच चित्र दरवाजामार्गे गडावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी या खुबलढा बुरुजाचा वापर केला जात असे. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच या विभागाने वेळीच डागडुजी न केल्यास शिवकालीन हा ऐतिहासिक बुरूज ढासळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडाचा पायरी मार्ग तसेच गडावरील वास्तूची होत असलेली पडझड पाहून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)>गडावर पायऱ्यांच्या मार्गालगत कड्यावरून दगड कोसळण्याच्या दुर्घटना नियमितपणे घडतात. गड उतरताना एका वर्षात दोघा पर्यटकांचा दगड पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही पुरातत्त्व विभागाला याबाबत गांभीर्य नाही. या कड्यांना जाळ्यांचे संरक्षण आवश्यक असून, तशी मागणी स्थानिक ग्रामस्थ अनंत देशमुख यांनी केली आहे. शिवकाळातील हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाचीच आहे, असे देशमुख म्हणाले.
रायगड किल्ल्याच्या खुबलढा बुरुजाखालील दरड कोसळली
By admin | Updated: August 2, 2016 05:34 IST