मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचा आक्षेप असणा-या खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या श्वेता परुळेकर यांचेही प्रवक्तेपद काढून घेण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाने पक्षात अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.पूर्वीच्या प्रवक्त्यांमध्ये आ. नीलम गोऱ्हे यांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या नव्या पॅनलमध्ये खा. अरविंद सावंत, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, आमदार विजय शिवतरे, अरविंद भोसले आणि भाजपातून आलेल्या डॉ. मनीषा कायंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. खा. संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरील उचलबांगडी चर्चेचा विषय बनली. मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत शरद पवार यांनी करताच खा. संजय राऊत यांनी भाजपाचे सरकार आम्ही पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचवेळी सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमात होते. तेथे त्यांनी आपण विरोधात बसू व हे सरकार टिकवण्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगितले होते. याआधीदेखील निवडणुकीच्या तोंडावर गुजराती समाजावर अग्रलेखातून राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘सामना’तून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेते नाराज आहेत. या सगळ्याचा परिपाक होऊन खा. राऊत यांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याचे समजते. मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभागही कमी झाला होता; तर सुभाष देसाई आणि परुळेकर हे प्रवक्ते असूनही माध्यमांमधील कोणत्याही चर्चेत फारसे कधीच सहभागी होत नव्हते.
राऊत, देसार्इंसह चौघांना प्रवक्तेपदावरून हटविले
By admin | Updated: November 22, 2014 03:37 IST