सांगली : शहर व परिसरात गेल्या महिन्याभरात तब्बल दहा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. या मृतदेहांचे पोलीसच नातेवाईक झाले आणि त्यांनीच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांच्यादृष्टीने हा चिंतेचा विषय बनला आहे.अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीच्या पुलाखाली दोन सडलेले मृतदेह सापडले. नांद्रे येथेही एक सडलेला मृतदेह सापडला. शहर पोलिसांना शंभरफुटी व कोल्हापूर रस्ता, शिवाजी मंडई, कृष्णा नदी, शिवाजी मंडई याठिकाणी असे चार मृतदेह सापडले. विश्रामबाग पोलिसांच्या हद्दीत बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. मार्केट यार्ड, सिव्हिल चौक, पुष्पराज चौक व शासकीय रुग्णालय अशा विविध ठिकाणी चार मृतदेह सापडले. या मृतदेहांची ओळख पटेल, असे काहीच सापडले नाही. त्यामुळे ओळख पटविणे अवघड बनले. पोलिसांनी मृतदेहांचे छायाचित्र काढून त्याआधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. काही पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून छायाचित्रातील वर्णनाची व्यक्ती बेपत्ता आहे का, याची माहिती घेतली. मात्र तरीही ओळख पटली नाही. (प्रतिनिधी)अंत्यसंस्कार पूर्णबेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलीस चार दिवस तपास करतात. तोपर्यंत मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागृहातील वातानुकूलित यंत्रात ठेवला जातो. या काळात कोणी नातेवाईक आले नाहीत, तर महापालिकेशी संपर्क साधला जातो. पाचव्यादिवशी पोलीसच त्या मृतदेहाचे नातेवाईक बनतात व मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मृतदेह दफन केला जातो. गेल्या महिन्याभरात सापडलेल्यांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले आहेत.
प्रमाण वाढले : पोलिसांकडूनच मृतावर अंत्यसंस्कार
By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST