नवी दिल्ली : शांता कुमार समितीचा अहवाल रद्द करून सार्वजनिक वितरण व्यवस्था पूर्ववत करावी यांसह विविध मागण्यांसाठी देशभरातील रेशन धान्य दुकानदारांंनी मंगळवारी दिल्लीत भव्य मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.सार्वजनिक व्यवस्था सक्षम करावी, रेशन धान्य दुकानात गॅस सिलिंडर, पोस्टातील वस्तू तसेच अन्य वस्तूंची विक्री करण्याची परवानगी मिळावी अन्यथा रेशन धान्य दुकानदारांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या मागण्यांसाठी धान्य दुकानदारांनी रामलीला मैदानावरून संसदेवर हा मोर्चा नेला. मोर्चाचे जंतरमंतर येथे सभेत रूपांतर झाले. या सभेत बोलताना अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हादभाई मोदी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. रेशन व्यवस्था ही सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे. तीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. यामुळेच आज आम्हाला रस्त्यावर यावे लागले आहे. एवढे करूनही सरकार ऐकत नसेल तर देशव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मोदी यांनी दिला. या सभेत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचेही भाषण झाले. रेशन व्यवस्था सर्वसामान्यांसाठी आवश्यक बाब असल्याने याबाबत आम्ही संसदेत आवाज उठविला आहे. अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले. मोदी सरकार काही करण्याच्या नादात वेगळेच काही करत आहे. त्यामुळे या सरकारला पूर्ण बहुमत दिले, ही चूक झाली की काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. रेशन धान्य दुकानदारांच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास ५० खासदार आंदोलनाच्या पाठीशी उभे करू, अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. (प्रतिनिधी)प्रभूंच्या माळा प्रभू रामचंद्रांनी आपल्याला मदत केली म्हणून सर्व वानरसेनेला मोत्याच्या माळा देऊ केल्या, पण वानरांनी माळेत राम-सीता नसल्याचे पाहून माळा फेकून दिल्या. अशाच पद्धतीने हे सरकार गरिबांसाठी काहीही करणार नसेल, तर त्याला जनता फेकून देईल, असा इशाराही खासदार महाडिक यांनी दिला. यावेळी अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार विक्रेता महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख, सरचिटणीस विश्वंभर बसू, उपाध्यक्ष प्रल्हादभाई मोदी, महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र आंबुसकर, प्रभाकर पाडाळे, चंद्रकांत यादव आदींची भाषणे झाली. दिल्ली येथे मंगळवारी देशभरातील रेशन धान्य दुकानदारांंनी भव्य मोर्चा काढला. जंतरमंतर येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
रेशन धान्य दुकानदारांचा दिल्लीत मोर्चा
By admin | Updated: March 18, 2015 00:50 IST