माहूर : नांदेड-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील माहूरच्या ऐतिहासिक रामगड किल्ल्यात युगुलाची गळा चिरून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तरुणी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदची तर तरुण उमरखेडचा आहे. हत्या नेमकी कशासाठी झाली, हे मात्र कळू शकले नाही. शाहरुख खान फिरोज खान पठाण (२३) रा. जाकीरहुसेन वॉर्ड उमरखेड जि. यवतमाळ आणि निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा (२०) रा. दुधे ले-आऊट गांधीनगर पुसद अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी रामगड किल्ल्यातील बारुदखान्याजवळ या दोघांचेही मृतदेह आढळून आले. शाहरुखच्या डोक्यावर चार घाव आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आले, तर निलोफरच्या उजव्या डोळ्यावर व डोक्यात तीक्ष्ण हत्याराने आरपार घाव घातल्याचे दिसून आले. निलोफर ही पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन शाखेत तृतीय वर्षात शिकत होती, तर शाहरुख याने पुसद येथील डॉ. एन.पी. हिराणी तंत्र निकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका घेतली. त्यानंतर त्याने यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला होता. हे दोघे १० सप्टेंबर रोजी इंडिका व्हिस्टा कार क्र. एम.एच.२९-३७७० ने पुसदवरून दुपारी १२ वाजता माहूरला आले. रामगड किल्ला पाहण्यासाठी ते किल्ल्यावर गेले. मात्र परतच आले नाही. इकडे या दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांचा शोध चालविला होता. घटनेची माहूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, जगदीश गिरी, अनिल जाधव, प्रियंका वासनिक यांनी रामगड किल्ल्यात शोध मोहीम राबविली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोघांचीही प्रेते येथील रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. रामगड किल्ल्यावर आणि रुग्णालयासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नेमकी हत्या कुणी आणि कशासाठी केली, हे मात्र कळू शकले नाही. परंतु या दोघांच्या मागावर तीन अनोळखी इसम असल्याची चर्चा माहूरमध्ये आहे. (वार्ताहर)
माहूरच्या रामगड किल्ल्यात युगुलाची गळा चिरून हत्या
By admin | Updated: September 12, 2014 00:53 IST