ऑनलाइन लोकमत
मुंबई, २० - विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा सामना चुरशीविनाच संपला. शिवसेना, काँग्रेस व अपक्ष उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
विधान परिषदेतील सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या डॉ. नीलम गो-हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेशी जवळीक असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या या चलाख खेळीने भाजपाची चांगलीच कोंडी होती. शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने भाजपा निवडणुकीत युती धर्म पाळणार की राष्ट्रवादीला साथ देणार याविषयी उत्सुकता होती. विधान परिषदेत सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होताच शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर काँग्रेसचे शरद रणपिसे व अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनीदेखील उमेदवारी अर्ज मार्ग घेतला. यानंतर विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे यांनी रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
शिवसेना - भाजपा एकत्रच
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवर चर्चा झाली असून या चर्चेनंतर मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी माहिती नीलम गो-हे यांनी दिली. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेहमीच एकत्र राहील असेही त्यांनी सांगितले. भाजपाने उमेदवार न दिल्याने आम्ही उमेदवारी अर्ज भरला होता असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.