सातारा : जिल्हा नियोजन समितीत जनतेचे प्रश्न मांडल्याबद्दल काहींना पोटशूळ उठला. त्यामुळे द्वेषभावनेतून त्यांनी एक-दोन कार्यक्रमांत आमचा उल्लेख ‘अतिरिक्त पालकमंत्री’ म्हणून केला. ते महाशय १९९५ पासून बारामतीकरांची तळी उचलून, मंत्रिपद टिकवून होते. मागच्या दाराने आमदार झाल्यानंतरचा काही काळ ते सातारचे पालकमंत्री होते. पालकमंत्री म्हणून काम करताना ते फक्तमान डोलावणारे आणि बारामतीकरांचा लोलक सांभाळणारे ‘लोलक-डोलक मंत्री’ होते,’ अशी टिका खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केली.उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी जनतेचे प्रश्न मांडले. पाटबंधारे विभागातील अनियमितता मांडली. त्यावर कारवाईची मागणी केली. त्यामध्ये काहीच चुकीचे नव्हते. जनतेच्या पैशांचा दुरुपयोग झाला असेल, तर त्यावर चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे. परंतु, काही व्यक्तींना त्यांच्या भानगडी, कुलंगडी बाहेर निघतील याची भीती वाटल्याने त्यांनी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा उपहासात्मक उल्लेख केला असावा.या बैठकीत मी राजशिष्टाचारानुसार पालकमंत्र्यांच्या बरोबरीने डायसवर जागा नेमून दिलेल्या ठिकाणी बसलो होतो. आमदार शशिकांत शिंदे पालकमंत्री होते त्यावेळेस व त्यापूर्वीही त्याच ठिकाणी बसलो होतो. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. फलटण किंवा एका तालुक्याचे म्हणून तेथे बसत नाही. यापूर्वी बोलावेसे वाटलेच नाही. मात्र, शिंदे यांच्या काळात कृषी विद्यापीठाचा ठराव मांडला व तो एकमताने मंजूर केला. तथापि, त्याची फक्त इतिवृत्तात नोंद घेण्यात आली म्हणून ठराव स्वरूपात तो पुन्हा मांडण्यात आला तो जनतेच्या हितासाठी. याचाच अर्थ पालकमंत्र्यांच्या शेजारी बसून मी प्रथमच बोललो नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत खरी भूमिका मांडल्यानेच त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि माझा उल्लेख ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा करण्याबरोबरच ते आपल्या कार्यकर्त्यांना रक्त सांडायच्या गोष्टी करू लागले आहेत, असेही उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)आज होणार गौप्यस्फोट?महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणातही झपाट्याने बदल होत आहेत. गेली पाच वर्षे शांत राहिलेले खासदार उदयनराजे अत्यंत आक्रमक झाले असून, रामराजे नाईक-निंबाळकर व शशिकांत शिंदे यांच्यासोबत त्यांच्या सतत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अतिरिक्त पालकमंत्री म्हणून उदयनराजेंचा उल्लेख केला गेल्यानंतर उदयनराजे गट संतप्त झाला असून, गेल्या पाच वर्षांतील माजी मंत्र्यांच्या अनेक कामांमधील घोटाळे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. ४) महाबळेश्वर येथे एका मोठ्या गौप्यस्फोटाची शक्यता आहे.आमच्या वाटेला येऊ नकायेथून पुढे या माजी पालक तथा डोलकमंत्र्यांनी कोणाला तरी खूश करण्यासाठी किंवा कुणाच्या तरी तळी उचलण्यासाठी, अनावधनानेही उल्लेख करून, हात दाखवून अवलक्षण करण्याचा योग आणू नये. लोकांवर अन्याय झालेली अनेक प्रकरणे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. तथापि, आम्ही तुमच्या वाटेत नाही, तर आमच्याही वाटेत येऊ नका, असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
रामराजे बारामतीकरांचे लोलकमंत्री !
By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST