उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाईक हे प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याचे सांगण्यात आले. नाईक यांनी आपला राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. फडणवीस यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
प्रकृती अस्वस्थ्य असताना राजीनामा प्रत्यक्ष घेऊन येऊ नका. मीच माझा प्रतिनिधि पाठववितो, असे काल मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार आज त्यांच्यावतीने आलेल्या प्रतिनिधीकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला असून मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
जानेवारी २०२५ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृति स्थिर असली तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असल्याने त्यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.
मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यांमुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे मत झाले होते. योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने हाच निर्णय घेतला. त्यामुळे महत्त्वाचे काम झालेच आहे, धोरण निश्चिती संदर्भातील अन्य कामांना अधिक विलंब नको या हेतूने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी यांनी मुख्यमंत्री आणि मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नीतेश राणे यांचे आभारही मानले आहेत.