मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात १०४ लोकांचा बळी घेणाऱ्या दारूकांडाचा मुख्य आरोपी राजू लंगडा याच्या १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब त्याच्या शेजाऱ्यांनी पहिल्याने त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची स्थिती गंभीर आहे.सतीश राजू तपकार (१७) असे या मुलाचे नाव असून, तो मालवणीत राहतो. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब त्याच्या शेजाऱ्यांनी पाहात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याबाबत जवळच राहणारे त्याचे मामा आणि मामाच्या मुलांना समजल्यानंतर त्यांनी सतीशला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने नंतर त्याला आॅस्कर रुग्णालयात हलविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू लंगडाला पोलिसांनी अटक केल्यापासून स्थानिक त्याला ‘हत्यारे का बेटा’ अशा नावाने टोमणे मारत होते. त्याला अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. त्यातच त्याने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. सतीशने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, आम्ही त्याबाबत अधिक चौकशी करीत असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
राजू लंगडाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: July 9, 2015 03:09 IST