कल्याण-डोंबिवली ते बदलापूर-वांगणीच्या पट्ट्यात पावसाने रविवारी तुफान फटकेबाजी केली. त्यात सर्वच महापालिका-नगरपालिकांच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले, इतके पाणी ठिकठिकाणी साठले होते. शिवाय खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने तेथील वाहतुकीचाही वेग मंदावला होता. कल्याण स्थानक परिसरात, विठ्ठलवाडी, उल्हासनगर येथे पावसाचे पाणी तुंबल्याने सखल भागातील घरे जलमय झाली. डोंबिवली स्थानकाच्या परिसरालाही सकाळच्या वेळेत अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. रविवारची सुटी असल्याने आणि रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द झाल्याने चाकरमान्यांना या पावसाचा फारसा त्रास झाला नाही. एकीकडे पावसाच्या अखंड धारा आणि त्यातच भरतीची वेळ गाठून आल्याने दीर्घकाळ पाण्याचा निचरा झाला नव्हता. दुपारी पावसाचा जोर ओसरल्यावर परिस्थिती थोडी निवळली. संध्याकाळनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला. त्यामुळे अनेकांची झोप उडाली. कल्याण : शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी सकाळी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. शिवाजी चौकात पाणी साचल्याने वाहनांना त्यातून मार्ग काढावा लागत होता. अशोकनगर परिसरात पाणी साचले होते. वालधुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने शिवाजीनगर परिसरात पाणी साचले होते. कल्याण पूर्वेत खडेगोळवलीहून वाहत येणाऱ्या नाल्याचे पाणी कल्याण-पुणे लिंक रस्त्यावरील पुलापर्यंत आले होते. विठ्ठलवाडी येथे रेल्वेमार्गाखालून जाणाऱ्या पुश थ्रू बोगद्यामुळे पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होत होता. त्यामुळे या परिसरात पाणी साचले नाही. कोळसेवाडी पोलीस ठाणे ते श्रीराम टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नव्हता. काटेमानिवली पुलाखालून जाणारा रस्ता उखडला आहे. तसेच कल्याण पूर्वेतील स्टेशन परिसरात बोगद्यात काही प्रमाणात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना त्रास झाला. कल्याण येथेही रेल्वेमार्गावर काही प्रमाणात पाणी साचले होते. कल्याणच्या एसटी आगारातही बस उशिराने सुटत होत्या. अनेक बस वाहतूककोंडीत अडकल्याने वेळापत्रक विस्कळीत झाले होते. भिवंडी ते कल्याण हे अंतर गाठण्यासाठी बसला तासापेक्षा अधिक वेळ जात होता.डोंबिवलीलाही झोडपलेडोंबिवली : पावसाने डोंबिवलीलाही चांगलेच झोडपून क ाढले. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी सकाळी साडेआठपासून जोर धरला. मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरातील राजाजी पथ, भाजीमार्केट, पाटकर रोड यासह गोपाळनगर, सुनीलनगर भागामध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले होते. येथील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या भागांमधील छोटे नाले, गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने त्या पाण्यातून वाट काढत पादचारी जात होते. डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, तर एमआयडीसी परिसरातील मिलापनगर, निवासी विभाग, सागाव-सागर्ली, नांदिवली भागही जलमय झाला होता. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले होते. टिळकनगर महाविद्यालयाजवळच्या औदुंबर कट्टा याठिकाणी सायंकाळी ५च्या सुमारास झाड पडल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. अधूनमधून संततधार सुरू होती. >कल्याण-मुरबाड रस्त्यावर कोंडीशहाड : जोरदार पावसामुळे कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हारळमध्ये सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्याच्या साइडपट्टीची माती खचल्याने काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. काही ठिकाणी रस्त्यावर माती वाहून आल्याने वाहतुकीस अडथळा झाला होता. म्हारळ, कांबा, वरप याठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. पांजरपोळ परिसरात नदीचे पाणी लहान पुलावरून वाहत होते.शेती पावसाच्या पाण्याखाली चिकणघर : गौरीपाडा परिसरातील सगळी शेती पावसाच्या पाण्याखाली गेल्याने त्याठिकाणी शेततळीसदृश परिस्थिती होती. गौरीपाडा परिसरातील तलावाजवळ असलेल्या मंदिराभोवती पाणी साचल्याने मंदिर निम्म्यापेक्षा अधिक पाण्याखाली गेले होते. पाण्यामुळे रस्त्यावरील डांबर व खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. काही ठिकाणी रस्ता चिखलमय झाला होता. ग्रामस्थांना अडचणींचा सामनाम्हारळ : कल्याण-टिटवाळा-मुरबाड या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक २२२ ची म्हारळ ते पाचवा मैलदरम्यान पावसामुळे दुरवस्था झाली. संततधारेने या महामार्गावर ठिकठिकाणी पावसामुळे गटारे तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आले. म्हारळ येथे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. >नालेसफाईमुळे शहापूरला पाणी साचले नाहीशहापूर : पावसाळ्यापूर्वी नगरपंचायतीने नालेसफाई केल्याने मराठा खाणावळ आणि बसवंत इमारत परिसरात पाणी न तुंबल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून परिसरातील गाळ्यांमध्ये शिरत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान व्हायचे. तसेच बसवंत इमारतीमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत असे. यापूर्वी ग्रामपंचायतीने कधीही नालेसफाई केली नव्हती. यंदा २० वर्षांनंतर प्रथमच शहापूर नगरपंचायतीने नालेसफाई केली. शिवाय, व्यापारी आणि जागामालकांचा विरोध लक्षात घेता ऐन पावसाळ्यात मराठी खाणावळ ते कीर्ती महाल हॉटेलच्या दिशेच्या नाल्यावरील स्लॅब तोडला आणि सफाई केली. मराठा खाणावळील गटाराची सफाई झाली नव्हती. तेथील जागामालक आणि भाडेकरूंनी हरकत घेतली होती. हे काम झाले नसते तर यंदाही पाणी तुंबले असते. पाणी साचले असते तर बसवंत इमारतीमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला असता. पूर्वी पाणी साचले की, लांबचा वळसा घालून रहिवाशांना घरी जावे लागत होते. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पाणी साचणार, हे दिसताच नगरपंचायतीतील शिवसेनेचे गटनेते सुभाष विशे यांनी नालेसफाई करण्यास सांगितल्याने रहिवाशांची चिंता दूर झाली.
पावसाची तुफान फटकेबाजी
By admin | Updated: August 1, 2016 03:24 IST