मुंबई : मान्सूनपूर्व वातावरणात वेगाने बदल होत असल्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ७२ तासांसाठी जोरदार मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.मध्य भारतावरील वातावरणात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रवात क्षेत्राचा परिणाम म्हणून तामिळनाडूसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील २४ तासांत पुण्यात १०३ मिमी पाऊस झाला. पुण्यात मे महिन्यात पडलेल्या पावसाची आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे. यापूर्वी ३१ मे १९२७ साली ८२.५ मिमी इतका पाऊस झाला होता.सद्य:स्थितीमध्ये मान्सूनपूर्व बदलाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि मराठवाड्यावरील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट नोंदविण्यात येत आहे. परिणामी, कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशावर स्थिरावला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पावसामुळे येथील कमाल तापमानाचा पारा खाली घसरला आहे. शिवाय शीत वारे वाहत असल्याने ४२ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पावसाचा जोर वाढणार
By admin | Updated: May 15, 2015 01:37 IST