रेल्वे घसरली : २५ घरांचे नुकसान
ऑनलाइन लोकमत
नंदूरबार, दि. ११ - तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला. पाचोराबारी येथे नाल्याचे पाणी गावात घुसल्याने सहाजण वाहून गेले. पैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चार किलोमिटरचा रेल्वेरूळ खचला असून सुरत-भुसावळ पॅसेंजरचे पाच डबे रुळावरून घसरले. २५ पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने तालुक्यातील शिवणनदीसह सर्वच नाल्यांना पूर आला. पाचोराबारी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी थेट गावात घुसले. त्यामुळे गावातील २५ घरांचे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री हा हाहाकार उडाल्याने ग्रामस्थांना बचावाची संधी मिळाली नाही. त्यामुळे सातजण वाहून गेले. पैकी तिघांचे मृतदेह सकाळी सापडले. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. १० ते १५ चारचाकी व दुचाकी वाहने देखील वाहून गेली. याच गावातून जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग देखील चार किलोमिटरपर्यंत खचला. त्याचेळी सुरत-भुसावळ पॅसेंजर जात असल्याने रुळ खचल्याचे चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबविण्यात आली. परंतू पाच डबे रुळावरून घसरले तर भराव खचल्यामुळे तीन डबे अधांतरी लटकले. प्रवाशांना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. या मार्गावरील सर्व एक्सप्रेस व मालवाहू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्यास सुरुवात केली आहे.