मुंबई/पुणे : मागील चार दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने संपूर्ण राज्याकडेच पाठ फिरविल्याचे चित्र आहे. समुद्र सपाटीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही, असे विभागातर्फे सांगण्यात आले. पावसासाठी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी कमी झाली आहे. मागील २४ तासांत कोकणात सावंतवाडी येथे तर विदर्भात आरमोरी व देसाईगंज येथे तुरळक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गेल्या २४ तासांत कुठेच पाऊस झालेला नाही.ऊन-पावसाचा खेळ!> रविवारी रंगलेल्या ऊन-पावसाच्या खेळाने मुंबापुरीतील वातावरण काहीसे आल्हादायक झाले. मागील आठवडाभर मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र गेल्या सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतली. मंगळवार वगळता पुढील चार दिवस पाऊस रजेवरच राहिला. रविवारी सकाळी मात्र त्याने पुन्हा एकदा आगमनाचे संकेत दिले.> परंतु ढगांची गडद चादर विखुरल्याने मुंबईत दुपारचे काही क्षण वगळता दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश राहिला. दुपारी लालबाग, परळ, लोअर-परळ अशा काही ठिकाणी पावसाची किंचित सर आली. नंतर मात्र शहरात वातावरण ढगाळ असूनही पाऊस पडला नाही.> महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत शहरात ०.३७, पूर्व उपनगरात ०.२३ आणि पश्चिम उपनगरात ०.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मालाडमधील चेतना कुंज सोसायटीचा काही भाग पडल्याची घटना घडली. > मरिन प्लाझाजवळ शालीमार इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असताना स्लॅब आणि बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. शहरात २, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. > शहरात २, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ७ ठिकाणी झाडे पडली. पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यात पावसाची विश्रांती!
By admin | Updated: June 29, 2015 02:15 IST