मुंबई : पत्नीच्या हत्येचा आरोप असलेल्या रायगडच्या अतिफ पोपेरेला (२४) या तरुणाला दुबईत देहदंडाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. फायरिंग स्क्वॉडकडून गोळ्या झाडून पोपेरेला देहदंड देण्यात येणार आहे. स्थानिक कायद्यानुसार पीडितेच्या म्हणजेच पत्नीच्या कुटुंबियांनी आरोपीला माफ केले तर त्याला जीवनदान मिळू शकते, मात्र तरुणीच्या आईने ही शक्यताही फेटाळून लावली आहे.मूळचा रायगड जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आतिफची माटुंग्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मिनी धनंजयनशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००८ मध्ये त्यांनी कुटुंबियांच्या संमतीने विवाह केला. लग्नानंतर मिनीचे नाव बदलून बुशरा ठेवण्यात आले. मुलगी झाल्यानंतर २००९ मध्ये आतिफने दुबईत नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी दोन वर्षांची झाल्यावर बुशराही दुबईला गेली. मात्र त्यानंतर वर्षभरातच बुशराला आतिफच्या पालकांकडे रायगडला पाठवण्यात आले होते, असे आतिफने सांगितले होते.त्यानंतर २०१३ साली बुशराचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी तरुणीच्या दुबईतल्या भावाला फोन केला. बुशराचा भाऊ निगीलने शोधाशोध केली, पण काहीच माहिती मिळत नसल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बुशराचा मृतदेह दुबईतील ‘अल फक्वा’भागात आढळल्याची माहिती १३ मार्च २०१३ रोजी पोलिसांनी तिच्या भावाला दिली. शवविच्छेदनाच्या अहवालात बुशराची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तथापि, पतीशी खटके उडत असल्याची कुठलीही माहिती आपल्या मुलीने दिली नव्हती, अशी माहिती बुशराच्या आईने दिली. सासरच्या मंडळींकडून मात्र त्रास होत असल्याचा उल्लेख तिने केला होता, असा जबाब बुशराच्या आईने दिला. बुशराचा मृतदेह सापडल्यानंतर गायब झालेला पोपेरे साथीदाराच्या मदतीने भारतात परतला. त्यानंतर जून २०१३ मध्ये दुबईत जात त्याने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. स्थानिक न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. येत्या दोन दिवसांत या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
रायगडच्या अतिफ पोपरेला दुबईत देहदंड
By admin | Updated: December 30, 2015 01:10 IST