ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 28 - कामगाराचे घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शाहू चौक, फुलेवाडी येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. तलवार, लोखंडी गजाचा वापर केल्याने दोन्ही बाजूंचे सहा जण गंभीर जखमी झाले. सुप्रीम सूर्यकांत घाटगे (३२), हणमंत सिद्राम बेन्ने (३०), सूर्यकांत धोंडिराम घाटगे (६०), मोहसीन फारुक मुल्लाणी (२९), शफिन फारुक मुल्लाणी (३२), मुन्ना लालासाहेब जमादार-काणीरे (३०), नितीन श्रीकांत सावंत (२६) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी भरदुपारी झालेल्या राड्यामुळे परिसरात तणाव पसरला. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. यावेळी दोन्ही गटांच्या नातेवाईक, मित्रांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत संशयितांचे अटकसत्र सुरू होते.जखमी सुप्रीम घाटगे याने पोलिसांना सांगितले, मी भगवा चौक, फुलेवाडी येथे चायनीजचा गाडा चालवितो. वडील व्यवसाय करतात. भाऊ खासगी वाहनावर चालक आहे. माझा मित्र हणमंत बन्ने (रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, फुलेवाडी) हा मार्केट यार्ड येथे नोकरी करतो. त्याचा गुरुवारी मध्यरात्री मला फोन आला. घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अल्लाबक्ष मुल्लाणी, मोहसीन मुल्लाणी, शफिन मुल्लाणी, नितीन सावंत यांनी मला मारहाण केली आहे. तू ताबडतोब ये, असे सांगितले. मी रात्री दोनच्या सुमारास तो राहत असलेल्या खोलीवर गेलो. तू एकटा आहेस, माझ्या घरी चल, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास चायनीज गाडी सुरू करण्यासाठी रिक्षातून (एम.एच.०७ एबी-८५६५) साहित्य घेऊन जात असताना रणजित घोरपडे व नितीन सावंत मोटारसायकलवरून माझ्या घरी आले. त्यांनी हणम्या कुठे आहे, अशी विचारणा केली. मी घरी आहे, असे सांगताच त्याला बाहेर बोलव, रात्रीचे प्रकरण मिटवायचे आहे, असे रणजित घोरपडे म्हणाला. त्यावर मी भांडणे नको, आम्ही त्याला घेऊन येतो, असे बोललो. त्यानंतर माझ्या रिक्षातून वडील, भाऊ व हणमंत बन्ने असे चौघेजण आम्ही शाहू चौकात आलो. याठिकाणी मोहसीन मुल्लाणी, शफिन मुल्लाणी, अल्लाबक्ष मुल्लाणी, मुन्ना जमादार-कानिरे, जावेद (पूर्ण नाव नाही), रणजित घोरपडे, नितीन सावंत यांच्यासह पंधराजण थांबले होते. रिक्षातून उतरल्यानंतर मोहसीनने आम्हाला तुम्ही मध्ये पडू नका, अशी दमदाटी केली. मी काय बोलायचे आहे ते आमच्यासमोर बोला, असे म्हणताच त्याने माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर वादावादी होऊन गोंधळ उडाला. यावेळी मोहसीनने चौकातील मंडळाच्या कट्यामागे लपविलेल्या तलवारी, लोखंडी गज काढून माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांत झालेल्या राड्यामध्ये रिक्षासह दुचाकी वाहनांची तोडफोड केली. फुलेवाडी शाहू चौकात भरदिवसा घटना घडल्याने परिसरात तणाव पसरला. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आर. पी. भूतकर व त्यांचे सहकारी आले. त्यांनी जखमींची विचारपूस करून सुप्रीम घाटगे याचा जबाब घेतला. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
प्रेमसंबंधावरून फुलेवाडीत दोन गटांत राडा; सहा गंभीर
By admin | Updated: October 28, 2016 19:58 IST