भार्इंदर : मीरा-भार्इंदर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपात मतदानाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री ९च्या सुमारास राडा झाला. भाजपा नगरसेविका गीता जैन यांनी माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांची मुलगी नगरसेविका असेन्ला मेंडोन्सा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मेंडोन्सा यांचा खासगी अंगरक्षक, नगरसेवक भगवती शर्मा आणि ३ कार्यकर्त्यांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.या मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीतले विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा व भाजपाचे गतवेळचे पराभूत उमेदवार नरेंद्र मेहता पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. हे दोघे एकमेकांचे राजकीय वैरी असल्याने यंदाची निवडणूक अशांततेची ठरणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. मंगळवारी त्यांच्यात सुरू असलेल्या किरकोळ धुसफुशीनंतर रात्री ९च्या सुमारास देवचंदनगर परिसरात मोठा राडा झाला. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळेत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या नगरसेविका गीता जैन (५०) या भार्इंदर पश्चिमेच्या देवचंदनगर परिसरातील आकाशगंगा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बोगस मतदार याद्या तयार करण्यासह मतदारांना पैशांचे वाटप करत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जैन यांना हटकले. त्यावरून ठिणगी पडली. त्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका असेन्ला यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहून जैन यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे असेन्ला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मतदानापूर्वी भाजपा, राष्ट्रवादीत राडा
By admin | Updated: October 16, 2014 05:10 IST