उमेदवारीसाठी जातीची समीकरणे जोरात
By admin | Published: September 13, 2014 02:27 AM2014-09-13T02:27:59+5:302014-09-13T02:27:59+5:30
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर जातीची समीकरणे टिकली नव्हती, पण या वेळी भाजपासह विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापल्या जातीला समोर करून उमेदवारी मागताना दिसत आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर जातीची समीकरणे टिकली नव्हती, पण या वेळी भाजपासह विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापल्या जातीला समोर करून उमेदवारी मागताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक, नेते आणि कार्यकर्तेही जातीचे गणित अनेक मतदारसंघांबाबत मांडत होते. अमुक एका जातीची मते अधिक असल्याने त्याच समाजाचा उमेदवार नक्की जिंकेल, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. प्रत्यक्ष निकालात मात्र मोदी लाटेशिवाय काहीही दिसले नाही. आता पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण जोरात आहे.
विशिष्ट जातीचे असल्याने आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर विजय नक्की असल्याचे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी खेटे घालणारे इच्छुक सांगत आहेत. लोकसभेत जात चालली नाही, त्यामुळे विधानसभेत ती नक्कीच चालेल, असे ते बिनदिक्कतपणे सांगत आहेत.
विदर्भात कुणबी, माळी, तेली, मुस्लीम, दलित, आदिवासी, बंजारा समाजांतील विविध पक्षीय इच्छुक आपापल्या समाजाच्या मतदारांची आकडेवारी घेऊन फिरत आहेत. खान्देश; उत्तर महाराष्ट्रात मराठा, लेवा पाटील, आदिवासी, माळी आदी जातींच्या इच्छुकांची गर्दी आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठा, वंजारी, धनगर या समाजांतील इच्छुकांची संख्या मोठी आहे.
मराठवाड्यात मराठा, वंजारी, धनगर, बंजारा, तेली, धोबी, माळी, मुस्लीम या समाजांच्या इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.
आपापल्या समाजाची शिष्टमंडळे पक्षाच्या नेत्यांकडे पाठविण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. समाजात ज्यांना प्रतिष्ठा आहे आणि जे कुठल्या विशिष्ट पक्षात नाहीत, अशांची मनधरणी करून त्यांना इच्छुक उमेदवार नेत्यांकडे पाठवतात. समाजाचे मोठे नेते येऊन विशिष्ट नावाचा आग्रह धरतात, त्यामुळे त्या नावाला वजन प्राप्त होते, असे मानले जाते.