यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २ डिसेंबर रोजी नागपुरात विशेष ‘हिवाळी वर्गा’चे आयोजन केले आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे मंत्र्यांना संघ मुख्यालयात मार्गदर्शन करतील. संघाच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी आणि संघाशी संबंधित विविध संघटनांच्या सेवाकार्याचे उद्देश सफल व्हावेत, यासाठी सरकार आणि संघामध्ये समन्वय राखण्यासाठी या विशेष ‘शिकवणी’ वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.मंत्रिमंडळाचा विस्तार २ डिसेंबरपूर्वी झाला, तर नव्याने शपथ घेतलेले मंत्रीदेखील या वर्गात सहभागी होतील. सार्वजनिक जीवनात वावरताना कसे वर्तन ठेवावे, याचे धडे या वेळी मंत्र्यांना दिले जाणार आहेत. ८ डिसेंबरपासून फडणवीस मंत्रिमंडळ पहिल्या विधिमंडळ अधिवेशनाला सामोरे जात आहे. तत्पूर्वी होणाऱ्या संघाच्या वर्गात मंत्रिमंडळातील सदस्य नेमका कोणता ‘धडा’ गिरवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. फडणवीस यांच्या रूपाने पहिल्यांदाच एक स्वयंसेवक मुख्यमंत्री संघाला लाभला आहे. त्यामुळे नागपूरस्थित संघ मुख्यालयात सध्या उत्साही वातावरण आहे. फडणवीस सरकारचा कारभार गतिमान व्हावा आणि चेहरा लोकाभिमुखच असावा, असा संघाचा आग्रह आहे.
रा. स्व. संघ घेणार मंत्र्यांचा वर्ग!
By admin | Updated: November 22, 2014 03:34 IST