मुंबई : आपल्यापेक्षा इतरांना मोठे होऊ न देणे हे राजकारणात चालते पण निरलस सेवाभावाने कार्यरत असलेल्या संघटनेत कार्य करणाऱ्यांमध्ये मात्र इतरांना मोठे करण्याचा गुण असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युरॉलॉजिस्ट दिवंगत डॉ. अजित फडके यांच्या जीवनावर लिहिलेल्या, ‘अॅन अमेजिंग ग्रेस’ आणि ‘चंद्रमे जे अलांछन’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ.भागवत यांच्या हस्ते वांद्रे येथील माणिक सभागृहात झाले. ‘आपल्या सोबत काम करणारे लोक आपल्यापेक्षा जास्त उंचीवर गेले पाहिजेत, हा संघटनेचा गुण डॉ. फडके यांच्या ठायी होता, असे सरसंघचालक म्हणाले. ‘मनुष्यत्वाची परीक्षा प्रत्येक मनुष्याला द्यावी लागते. ती मूल्यांची जपणूक करून उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. यशासाठी मूल्ये सोडावी लागली हे समर्थन अयोग्य आहे. यशस्वी होणे हा गुन्हा नाही पण त्याला मूल्यांची जोड आवश्यक आहे. डॉ.फडकेक़हे मूल्य जपणारे असेच यशस्वी पुरुष होते, असे सरसंघचालक म्हणाले. डॉ. फडके यांच्या ठायी असलेली प्रचंड विद्वत्ता आणि कीर्तीचा दबाव समोरच्यावर कधीही येत नसे. ते सर्वांशीच सहज वागत असत. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूल्यशिक्षण कधी यायचे ते येईल पण डॉ. फडकेंसारख्यांच्या जीवनचरित्रातून हे शिक्षण आपसुकच मिळते, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ.फडके यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात डॉ.प्रफुल्ल देसाई, डॉ.संजय ओक, औरंगाबादचे डॉ.अनंत पंधारे, लातूरचे डॉ.अशोकराव कुकडे, डॉ.हर्षद पुंजानी, राजश्री बिर्ला यांचा समावेश होता. डॉ.अचला जोशी, डॉ.राजेंद्र फडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
इतरांना मोठेपण देणे हाच संघटनेचा गुण
By admin | Updated: October 16, 2015 03:46 IST