नागपूर विद्यापीठ : ३० आॅक्टोबरपासून हिवाळी परीक्षानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी यंदाच्या हिवाळी परीक्षा म्हणजे एक मोठे आव्हानच आहे. परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३० आॅक्टोबरपासून परीक्षांना सुरुवात होणार असून साधारणत: २५ डिसेंबरपर्यंत त्या चालणार आहेत. हिवाळी परीक्षा शैक्षणिक कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या तारखांपेक्षा २० दिवस विलंबाने सुरू होणार आहेत.विद्यापीठाने सुरुवातीला १० आॅक्टोबरपासूनच परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु विधानसभा निवडणुकांना पाहता तारखा निश्चित करण्यात अधिकाऱ्यांची चांगलीच कसरत झाली.जर १० आॅक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या असत्या तर १५ आॅक्टोबरच्या मतदानामुळे वेळापत्रकात ‘गॅप’ द्यावी लागली असती. अखेरच्या क्षणी १५ ते २० तारखेदरम्यानचे पेपरदेखील रद्द करावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील अडचण झाली असती व विद्यापीठाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता. त्यामुळेच या परीक्षा ३० आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)३ टप्प्यांत होणार परीक्षाविद्यापीठाने सुरुवातीला केलेल्या घोषणेनुसार ७२४ विषयांची परीक्षा ५ ऐवजी ३ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील तर तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यात सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील. मूल्यांकनाचे आव्हान पाहता विद्यापीठाने २५ डिसेंबरपर्यंत परीक्षा संपविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने अद्यापपर्यंत पूर्ण परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
निवडणुकांचा परीक्षेला धक्का
By admin | Updated: October 6, 2014 00:57 IST