मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता राज्य सरकारने सात जागांची निवड केली असून त्यापैकी एका ठिकाणी स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.ठाकरे यांच्या स्मारकाकरिता दादर शिवाजी पार्क येथील महापालिकेचे क्रीडाभवन व महापौर बंगल्याशेजारील जागा या दोन जागांबरोबरच वडाळा येथील आयनॉक्स शेजारील भूखंड, परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयाजवळील जागा, एनटीसीकडून मिलच्या पुनर्विकासानंतर राज्य शासनाच्या ताब्यात आलेली परळ येथील जागा आणि माटुंगा व वांद्रे येथील दोन जागा यांचा समावेश आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या जागांची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांची जयंती असून त्यापूर्वी सरकारला स्मारकाच्या जागेची घोषणा करायची आहे. जागेबाबतचा निर्णय निर्णय फडणवीस व ठाकरे यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. शिवसेनेने महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभे करून तेथेच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र आता सरकारने शिफारस केलेल्या जागांमध्ये रेसकोर्सच्या जागेचा समावेश नाही. त्यामुळे शिवसेना वरील सात जागांपैकी एका जागेचा स्वीकार करणार की रेसकोर्सवरच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा आग्रह धरणार याबाबत कुतूहल आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता सात जागांचा प्रस्ताव
By admin | Updated: January 13, 2015 03:17 IST