सांगली : कृष्णा नदीला संभाव्य पूर नियंत्रणासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून सर्व उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकधरण व्यवस्थापनाचा समन्वय व्यवस्थित सुरू आहे. राज्य शासनाकडून पूर नियंत्रणासाठी नियोजन केले जात आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिली.सूर्यवंशी म्हणाले, अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी रुरकी येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती केली आहे. जलसंपदा विभागाकडून त्यांच्यासोबत बैठक घेऊन पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठांनी प्रत्यक्ष भेटीतून कामकाजाची माहिती घेतली आहे. पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर बैठक झाली. मे महिन्यातील बैठकीत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास करायच्या उपाययोजना, धरणातील पाणीसाठा नियंत्रण आदी विषयांवर चर्चा झाली. कर्नाटक शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अलमट्टी धरण व हिप्परगी बॅरेज प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. माहितीची देवाण-घेवाण, अलमट्टीचा साठा नियंत्रित करणे, मान्सून कालावधीत हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पूर्णपणे उचलणे, आदी गोष्टी ठरल्या आहेत. जलसंपदामंत्री यांनी मुंबईत सर्वपक्षीय पूर संघर्ष समितीसोबत बैठक घेतली. ती अलमट्टी धरण उंचीवाढ संबंधात लवादा पुढे व सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. त्याप्रमाणे कार्यवाही शासन करत आहे. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीतही पाटबंधारे विभागाने सविस्तर माहिती दिली आहे.आमच्या सूचनानुसार अलमट्टीतून विसर्गअलमट्टी धरण व हिप्परगी बॅरेज प्रशासनासोबत दररोज संपर्क ठेवला आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्याबाबत कर्नाटक धरण प्रशासनास सूचना देण्यात येत आहेत. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये धरणातील विसर्ग व जास्त पर्जन्यमानामुळे नदीतील पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाल्यास सदरचे पाणी हे अलमट्टी धरणामध्ये पोहोचण्याच्या अगोदर धरणातून आवश्यक तो विसर्ग करावा, असे ठरले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
पूर नियंत्रण कामाचे सर्वेक्षणपावसाळा कालावधीसाठी वर्ग-एक दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांची अलमट्टी धरण व हिप्परगी बॅरेजवर पूरसमन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. जलद समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा आंतरराज्य समन्वय वॉट्सॲप ग्रुप केला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून पूर नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे. सर्वेक्षणाची व प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही अमर सूर्यवंशी यांनी सांगितले.