पुणे : पंजाच्या चिन्हावर वेगवेगळ्या डायमंडची सजावट, घड्याळाची आकर्षक रचना, झेंड्यांच्या कडेने केलेली डिझाईन, खिशाला लावायचे बॅज, पक्षाच्या रंगाचे पेन यामुळे हे नव्याने चीनहून आलेले साहित्य उमेदवारांना आकर्षित करीत आहेत़ विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांची चिन्हे व त्याला अनुसरुन तयार करण्यात येत असलेल्या साहित्यात नाविन्यपूर्ण डिझाईन केल्याने चीनने या मार्केटवरही आता लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. राज्यात चायना मेड निवडणूक साहित्याची रेलचेल सुरु आहे़ आपले चिन्ह जास्तीजास्त मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड असते़ पदयात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणांना पुरविण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची मागणी असते़ लहान मुलांना तर अशा छोट्या छोट्या वस्तूंचे मोठे आकर्षण असते़ हे लक्षात घेऊन चीनच्या व्यावसायिकांनी या उद्योगातही उडी घेतली आहे़ थेट चीनहून अशा निवडणूक साहित्याचे भरलेले जहाज मुंबई बंदरात काही दिवसांपूर्वी आले होते़ आता हा सर्व माल राज्यातील जवळपास सर्व शहरामध्ये पोहचला आहे़ नाविन्यपूर्ण डिझाईन, आकर्षक रंगसंगती आणि लक्ष वेधून घेतील अशी रचना त्याचबरोबर तुलनेने कमी किंमत यामुळे या साहित्याला मागणी वाढत आहे़ विशेष म्हणजे अशाप्रकारचे साहित्य भारतीय उद्योजक तयार करीत नसल्याने चायनाच्या या मालाला चांगला उठाव आहे़ (प्रतिनिधी)
प्रचार साहित्यही ‘मेड इन चायना’!
By admin | Updated: October 8, 2014 03:55 IST