औरंगाबाद : योगाप्रमाणेच पर्यायी उपचार पद्धतींनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन राज्याचे गृह तथा अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. जागतिक रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुंबईत आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल यावेळी त्यांनी संयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. सप्ताहानिमित्त या उपचार पद्धतींशी संबंधित सर्व संस्थांच्या माध्यमातून देशभर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या संपूर्ण आयोजनात मीडिया पार्टनर म्हणून लोकमत समूहाने भूमिका निभावली. १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजित सप्ताहात देशातील २५ हजार तज्ज्ञांनी दररोज २ तास सेवा दिली. लाखो रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.केसरकर म्हणाले, उपचार करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नावापुढे डॉक्टर लिहिण्याऐवजी ज्या थेरपीत पदवी मिळविली असेल ती लिहावी. उदा. सुजोक थेरपी विशेषज्ञ, रिफ्लेक्सोलॉजिस्ट आदी. यामुळे त्यांची वेगळी प्रतिमाही तयार होईल. खा. शिंदे म्हणाले, एखाद्या विशिष्ट उपचार पद्धतीनेच उपचार करण्यासाठी रुग्णांना तज्ज्ञांनी दबाव आणू नये. उलट एखाद्या पद्धतीने रुग्णाला लाभ होत नसेल तर त्याला त्याविषयी योग्य माहिती द्यावी. तसेच त्याला दुसऱ्या तज्ज्ञांकडे रेफर करावे. यामुळे या व्यवसायाची प्रतिमा उंचावेल. कार्यक्रमाचे संयोजक अनिल जैन यांनी सप्ताह आणि परिषदेची सविस्तर माहिती दिली. केसरकर यांच्या सल्ल्यानुसार जेवढेही जेआर थेरपीस्ट आहेत ते आपल्या नावापुढे डॉक्टर लिहिणार नाहीत, असे जैन यांनी स्पष्ट केले. या उपचार पद्धतीच्या यशस्वीतेचा दर ८० टक्के आहे. तरीही एखाद्या रुग्णाला फायदा होत नसेल तर त्याला दुसऱ्या तज्ज्ञांकडे पाठविले जाते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात रिफ्लेक्सोलॉजी उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. जैरी मंजू ठोले यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन मुक्ता दुग्गड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलेश कांकरिया, आनंद दुग्गड, विकास पाटणी, विवेक बागरेचा, किशोर चौधरी, राजेंद्र तोंडपूरकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
योगाप्रमाणेच पर्यायी उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणार
By admin | Updated: September 27, 2016 01:55 IST