ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १ - परभणीतील आनंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहणारे प्राध्यापकाचा स्फोटात मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अतुल वाघमारे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते आंबेजोगाईतील पॉलिकेक्निक कॉलेजमध्ये रसायन शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
आनंदनगर येथे अमोल वाघमारे आणि अतुल वाघमारे या दोघा जुळ्या भावंडांनी भाड्याने खोली घेतली होती. रविवारी सकाळी अतुल वाघमारे घरी एकटेच होते. या दरम्यान घरात भीषण स्फोट घडला व या स्फोटात वाघमारे यांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर घरातील काचाही फुटल्याने विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून उद्या एटीएस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळाचा आढावा घेणार आहेत. रसायनांमुळे हा स्फोट झाला आहे का यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.