कोल्हापूर : एक अभिनेता म्हणून कोणत्या प्रकारचे चित्रपट करायचे, हे मी ठरविलेले नसते. मला चांगली वाटलेली भूमिका मी करतो. त्यात काही चित्रपट केवळ मनोरंजनात्मक असतात, तर काही ‘आॅफ बीट’ असतात. मनोरंजनासोबतच मनाला स्पर्श करणारे आणि काहीतरी सामाजिक संदेश देणारे चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न असतो, अशा शब्दांत अभिनेता अजय देवगण यांनी चित्रपटसृष्टीतील ‘करिअर’ उलगडले. ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभात झालेल्या प्रकट मुलाखतीत अजय देवगण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘सिंघम स्टाईल’ने ‘आता माझी सटकली...’ म्हणत त्यांनी मान्यवरांना खूश केले. माझ्या अभिनयात विविधता असावी, अशी माझी इच्छा असते आणि प्रेक्षकांनी मला प्रत्येक भूमिकेत पसंत केले, असे सांगून प्रेक्षकांचे ऋणही व्यक्त केले. ‘विटी दांडू’ या त्यांची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटाविषयी ते म्हणाले, ‘महाराष्ट्रीय संस्कृतीचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे’. ‘सिंघम’मध्ये मी केलेली मराठी भूमिका आणि ‘विटी दांडू’ हे दोन्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर आधारलेले चित्रपट आहेत. ‘सिंघम’मध्ये मी खूपच आक्रमक पोलीस अधिकारी आहे, तर ‘विटी दांडू’ हा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातला आजोबा आणि नातवाच्या प्रेमळ नातेसंबंधावर आधारलेला चित्रपट आहे. चांगली भूमिका आली तर मी मराठी चित्रपटातही काम करेन. काजोल यांचे मराठीवर खूप प्रेम आहे. त्यांनी तुम्हाला मराठी चित्रपट करण्यासाठी सुचविले होते का? यावर ते म्हणाले, चित्रपटाची कथा मला आवडली होती. ती काजोलनेही वाचली, तिनेही या चित्रपटाच्या निर्मितीला होकार दिला. तू मराठीत अभिनय कधी करणार ? : अभिनेते अजय देवगण यांचे मराठी चित्रपटनिर्मितीसाठी कौतुक करतानाच खा. विजय दर्डा यांनी ‘तू मराठी चित्रपट निर्मिती केलीस, पण मराठीत अभिनय कधी करणार ?’ असे विचारले. मराठी चित्रपट प्रेरणादायी... अलीकडे अनेक बॉलिवूड स्टार्स प्रादेशिक चित्रपटांकडे वळत असताना तुम्हाला मराठी चित्रपटाची निर्मिती का करावीशी वाटली? या प्रश्नावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, बॉलिवूड किंवा बदलत्या अभिरूचीचा परिणाम म्हणजे आता प्रादेशिक चित्रपट आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने मात्र दर्जेदार कथानक आणि सादरीकरणाने आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट जोडली आहे आणि तिचे प्रतिबिंब या चित्रपटांतून उमटते म्हणून मराठी चित्रपट मला अधिक प्रेरणादायी वाटतात. त्याचाच एक भाग बनावे, अशी माझी इच्छा होती, ती ‘विटी दांडू’च्या निमित्ताने पूर्ण झाली. ‘लिजंड आॅफ भगतसिंग’ तुम्ही आजवर शंभराहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यात आवडती भूमिका कोणती ? यावर ते म्हणाले, मला आवडलेली भूमिकाच मी करतो. त्यात आठवणीत राहणारा चित्रपट म्हणजे ‘लिजंड आॅफ भगतसिंग’. हा चित्रपट करताना मी भगतसिंग यांचे चरित्र जाणून घेतले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान, या सगळ्याने मी खरंच भारावून गेलो. त्यांच्यासारखे काम कोणीही करणे शक्य नाही. ‘लोकमत’तर्फे दक्षिण विभागाचे सहायक व्यवस्थापक (जाहिरात) अलोक श्रीवास्तव यांच्या हस्ते मान्यवर आयकॉन्सचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘आयकॉन्स आॅफ दक्षिण महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ५१ मान्यवरांचा या बुकमध्ये समावेश आहे. या आयकॉन्सचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारही उपस्थित होता. आकर्षक रंगमंच, शिस्तबद्ध सोहळा रसिकांनी अनुभवला़ महालक्ष्मीला साकडे : अभिनेता अजय देवगण यांनी, बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. अजय देवगण देवीच्या दर्शनासाठी येणार हे कळल्याने मंदिर परिसरात तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती. भवानी मंडपापासूनचा परिसर हाउसफुल्ल झाला होता.
सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य विटी दांडू चित्रपट
By admin | Updated: November 21, 2014 01:25 IST