अतुल कुलकर्णी / मुंबई चलनातून बाद ठरलेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची १४ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत दिलेली मुदत संपली असल्याने, खासगी हॉस्पिटलमध्ये या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली. मेडिकल स्टोअर्सना अजूनही जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.नाणेटंचाईमुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारने खासगी रुग्णालयांंना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानी दिली होती. ती मुदत १४ नोव्हेंबरला संपल्याने, धनादेश स्वीकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी रुग्णालयांना दिले. तरीही काही रुग्णालयांकडून रोख रकमेसाठी रुग्णांची हेळसांड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ : तावडेदहावी व बारावीच्या परीक्षांचे शुल्क भरण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, परीक्षा देण्यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या नोटांमुळे प्रवेश शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहेत.तशा तक्रारीही शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांनी सरकारकडे केल्या होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम फॉर्म भरावा व नंतर शुल्क भरावे, त्यासाठी या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
खासगी रुग्णालयांवर नोटाबंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:11 IST